म्हसवड परिसरात मुसळधार पावसाचा कहर शाळा बंद, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, :प्रतिनिधी
म्हसवड शहरासह माण तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू असून आज (शनिवार)सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. पहाटेपासूनच मुसळधार सरींचा जोरदार मारा सुरू असल्याने शहर व परिसर पाण्याखाली गेला. विशेषतः माणगंगा नदी दुथडी भरून वाहत असून नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे.

आटपाडीकडे जाणाऱ्या माणगंगा नदीवरील पुलाला सकाळीच पाणी टेकल्याने नागरिकांनी नदीला वाढलेले पाणी पाहण्यासाठी या पुलावर गर्दी केली होती उत्तमराव अकडमल आण्णा (तलाठी) यांनी पूर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुलावर उभे असणाऱ्या सर्व नागरिकांना त्वरित हलवून नारिकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
सातारा–पंढरपूर हायवेवरील म्हसवड बसस्थानक चौक ते शिंगणापूर चौक या दरम्यानचा रस्ता तलावाचे स्वरूप धारण करून वाहतुकीसाठी धोकादायक ठरला.रस्त्यावर कमरे एवढे पाणी वाहत असून व्यापाऱ्यांच्या तळमजल्यातील दुकानांत दहा बारा फुट पाणी शिरल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी शनिवारी सकाळी सहा वाजताच प्रांताधिकारी, तहसीलदार व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद ठेवण्याची विनंती केली. त्यांच्या मागणीची दखल घेत शिक्षण विभागाने पालकांना सूचना देत अतिवृष्टीग्रस्त भागातील शाळांमध्ये मुलांना पाठवू नये असे स्पष्ट केले.

अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासन

दरम्यान, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आंधळी धरणातून पाणी सोडण्यात आलेले नाही, तर वरच्या भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळेच नदीची पाणीपातळी वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी प्रशासनाला सतर्क राहून योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्याचे नितीन दोशी यांनी सांगितले.

नागरिकांना आवाहन

सध्या म्हसवड शहर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस प्रशासन व स्थानिक यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी नदीकाठ व धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी समन्वय साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *