सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान – पंचनामे तातडीने करा : पालकमंत्री जयकुमार गोरे
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
अदनान कल्यानी
सोलापूर, –प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेती, घरे व जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांसह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले की, पावसामुळे बाधित झालेल्या शेती, घरे, जनावरे यांचे पंचनामे कालमर्यादेत पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावेत. गटविकास अधिकारी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांची पथके तातडीने कामाला लागावी. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून पीडितांना दिलासा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
त्यांनी पूरग्रस्त भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्यधोक्यांची शक्यता लक्षात घेऊन योग्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच पंढरपूर तालुक्यातील स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पोहोचवावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. उजनी व वीर धरणांतून होणाऱ्या पाणी विसर्गामुळे निरा, भीमा व सीना नदीकाठच्या गावांना पूराचा मोठा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले.
📊 नुकसानीचा आढावा
बाधित गावे : 172
बाधित शेतकरी : 46,348
शेतीपिकांचे नुकसान : 47,804 हेक्टर
सर्वाधिक नुकसान : दक्षिण सोलापूर (18,471 हेक्टर)
त्यापाठोपाठ : उत्तर सोलापूर (14,004 हेक्टर), माढा (8,721 हेक्टर), पंढरपूर (5,295 हेक्टर)
जनावरांचा मृत्यू : 3
घरांची पडझड : 48 (अक्कलकोट – 45, दक्षिण सोलापूर – 2, माळशिरस – 1)
जिल्ह्यात सोलापूर, शेळगी, मार्डी, वडाळा, तिर्ऱ्हे, बोरामणी, मुस्ती व किणी मंडळ या भागांत अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे.
👉 पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचनाही दिल्या की, पंचनाम्यांमधून एकही शेतकरी वंचित राहणार नाही.

