स्वच्छता हीच ईश्वरसेवा: महिलांचा “स्वच्छ गाव, सुंदर गाव” संकल्प
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
कुलदीप मोहिते
पाडळी हेळ, कराड:
स्वच्छता हीच ईश्वरसेवा मानून गावातील महिलांनी “स्वच्छ गाव, सुंदर गाव” संकल्पनेचा अंगीकार करत गाव स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री “लाडकी बहीण” शासकीय योजनेच्या अध्यक्षा दीपालीताई खोत यांच्या उपस्थितीत पाडळी हेळ येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमात दीपालीताई खोत यांनी उपस्थित महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्या म्हणाल्या,
“स्वच्छता ही केवळ एक गरज नाही, तर ती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. महिलांनी या अभियानात पुढाकार घेऊन ओला व सुका कचरा वेगवेगळा करावा आणि तो नियमितपणे ग्रामपंचायतच्या घंटागाडीमध्ये जमा करावा. गावातील प्रत्येक घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास हे अभियान अधिक प्रभावी ठरेल.”
या कार्यक्रमाला ग्रामसेवक सावंत अण्णासाहेब, युवा नेते पुरंदर जाधव, ह.भ.प. जगन्नाथ जाधव, प्रभाग संघपाधिकारी शैला चव्हाण, ग्रामसंघ अध्यक्षा सुवर्णा शिंदे, तसेच अनेक महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. बचत गट प्रेरिका ज्योती ठोंबरे, ग्रामपंचायत माजी सरपंच मंजुषा भोज, इस्कॉन सेविका सविता शिंदे, विद्या जाधव, शारदा जाधव, शांताबाई जाधव यांच्यासह गावातील महिला कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गावातील महिलांनी पुढाकार घेत घराघरातून कचरा संकलन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या शिस्तीबरोबरच, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे वचन महिलांनी दिले. “स्वच्छ गाव, सुंदर गाव” ही केवळ योजना नसून एक चळवळ आहे, जी समाजाच्या सहभागानेच यशस्वी होईल,” असेही महिलांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे गावातील आरोग्यदायी वातावरण टिकून राहील तसेच ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढेल. स्थानिक प्रशासन व महिलांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पाडळी हेळ गाव लवकरच एक स्वच्छतेचे आदर्श गाव बनेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
—
“स्वच्छ गाव, सुंदर गाव” या चळवळीला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

