मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद अर्जुन जाधव यांना सैनिक फेडरेशनची भावपूर्ण श्रद्धांजली
व्हिजन २४ तास न्यूज
कराड, प्रतिनिधी :
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेले शहापूर (ता. कराड) येथील सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन जाधव (वय ३०) यांना सैनिक फेडरेशनसह आजी-माजी सैनिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शासकीय इतमामात झालेल्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण परिसर शोकमय झाला होता.
उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या अर्जुन जाधव यांचे पार्थिव शहापूर येथे आणण्यात आले. गावकऱ्यांनी सजवलेल्या वाहनातून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले. “वीर जवान अमर रहे”, “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
सैन्य व पोलिस दलाकडून बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. त्यांचे बंधू, जे स्वतः भारतीय सैन्यात कार्यरत आहेत, यांनी अंत्यसंस्काराची विधी पार पाडली. कुटुंबीयांचा आक्रोश आणि ग्रामस्थांचा भावनिक निरोप उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.
सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी सैनिकांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद अर्जुन जाधव यांना अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, विविध प्रशासकीय अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रतिनिधी, पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच अनेक सैनिक संघटनांचे पदाधिकारी आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहापूरसह संपूर्ण कराड तालुक्याने आपल्या वीर सुपुत्राला अश्रुपूर्ण निरोप देत त्यांच्या देशसेवेचा अभिमान व्यक्त केला. मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेले त्यांचे सर्वोच्च बलिदान कायम स्मरणात राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

