सपोनि संदीप पोमण यांनी कारवाईचा धडाका कायम ठेवावा; टवाळखोरांना वठणीवर आणण्याची नागरिकांची मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड प्रतिनिधी |

   म्हसवड शहरात वाढत चाललेला टवाळखोरांचा उच्छाद, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट, भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकी आणि वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि यांनी सुरू केलेल्या कारवाईचे नागरिकांतून जोरदार स्वागत होत आहे. मात्र ही कारवाई केवळ एक-दोन दिवसापुरती मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी ठाम मागणी आता नागरिकांतून होत आहे.

   शहरात अनेक ठिकाणी काही तरुणांकडून दुचाकींवर स्टंटबाजी, बदललेले सायलेंसर लावून कानठळ्या बसवणारे आवाज तसेच चौकाचौकात टवाळक्या करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकदा मुख्य रस्ते आणि बाजारपेठ भागात भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

      याच पार्श्वभूमीवर सपोनि संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अलीकडे विशेष नाकाबंदी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईनंतर काही प्रमाणात टवाळखोरांमध्ये धाक निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्र, पोलिसांचा दबाव कमी होताच पुन्हा हेच प्रकार सुरू होतात, असा अनुभव नागरिकांनी मांडला आहे.

    “वाहतूक नियम मोडणाऱ्यांना फक्त दंड करून सोडून उपयोग नाही, तर अशा बेदरकार वाहनचालकांना कायम वठणीवर आणण्याची गरज आहे. सपोनि संदीप पोमण यांनी सुरू केलेली कारवाई नियमित राहिली तरच शहरात शिस्त निर्माण होईल,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

       विशेषतः शाळा, महाविद्यालय परिसर, बाजारपेठ, बसस्थानक आणि प्रमुख चौकांमध्ये दररोज नाकाबंदी व तपासणी मोहीम राबविण्याची मागणी होत असून, पोलिसांनी आता आणखी कठोर भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *