माण–खटाव तालुक्यातील शिक्षक, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे : प्रशासनाचा इशारा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण) प्रतिनिधी :
माण–खटाव तालुक्यातील शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाच्या नियमां नुसार आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास राहणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुख्यालयी न राहिल्यास शिक्षण, आरोग्य व ग्रामविकासाशी संबंधित कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के (रा. भाटकी, ता. माण) यांनी पंचायत समिती माण येथे उपोषणादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच यासंदर्भात ९ जानेवारी व ६ मार्च २०२६ रोजी प्रशासनाशी चर्चा देखील करण्यात आली होती. त्यानंतर पंचायत समिती माणचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी संबंधित विभागांना स्मरणपत्र देत शासन परिपत्रकानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या दि. ९ सप्टेंबर २०१९ च्या परिपत्रकानुसार प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या नियुक्तीच्या मुख्यालयात राहणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची मुख्यालयी वास्तव्यासंदर्भात पडताळणी करावी, कर्मचारी मुख्यालयी राहत असल्यास त्याबाबत ग्रामसभेचा ठराव घ्यावा आणि राहत नसल्यास शासन नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना स्मरणपत्रातून देण्यात आल्या आहेत.
या बाबत कोणतीही दिरंगाई किंवा टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. याबाबतची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) जिल्हा परिषद सातारा यांनाही पाठविण्यात आली आहे.
दरम्यान, माण–खटाव तालुक्यातील नागरिकांनीही जागरूक राहून आपल्या गावातील शिक्षक, ग्रामसेवक किंवा आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यास त्याची माहिती पंचायत समिती किंवा गटविकास अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के यांनी केले आहे. गावाचा विकास हा ग्रामस्थांच्या सहभागातूनच शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

