रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीशिवाय सत्ता अशक्य; मीच ‘कॅप्टन’, उमेदवार माझे ‘मॅचविनर’ खेळाडू! :- खा. सुनील तटकरे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसळा : सुशील यादव

“रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय सत्ता स्थापन होणे केवळ अशक्य आहे. ही निवडणूक म्हणजे केवळ राजकारण नसून विकासाची लढाई आहे. या विकासाच्या स्पर्धेचा ‘संघनायक’ (कॅप्टन) मी स्वतः असून माझे उमेदवार हे मैदानात विजय मिळवून देणारे सक्षम खेळाडू आहेत,” अशा शब्दांत खासदार सुनील तटकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.


म्हसळा तालुक्यातील पाभरे, खरसई आणि मेंदडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. “विरोधक केवळ आमची ‘विकेट’ घेण्याच्या प्रयत्नात आहेत, पण आम्ही विकासाच्या जोरावर या निवडणुकीत चौकार आणि षटकार मारणार हे निश्चित आहे.”
मतदारांना आवाहन करताना तटकरे म्हणाले की, “प्रत्येक मतदान केंद्रावर मी आणि मंत्री आदिती तटकरे स्वतः उमेदवार आहोत असे समजून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या.”
राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार हे केवळ कार्यकर्ते नसून सामाजिक कामात सक्रिय असलेले आणि जनतेच्या सुख-दुखात धावून जाणारे अनुभवी व्यक्ती आहेत.
विरोधकांवर जोरदार टीका
खासदार तटकरे यांनी विरोधकांच्या जातीपातीच्या राजकारणाचा समाचार घेताना म्हटले की, “आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांचे आहोत आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करतो. मात्र, ज्यांचा विकासाशी दुरान्वये संबंध नाही, असे लोक केवळ जाती-पातीचे राजकारण करून राजकीय फायदा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.”
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार अनिल बसवत, पंचायत समिती उमेदवार समृद्धी चाचले व लहू म्हात्रे यांच्यासह तालुकाध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती महादेव पाटील, नाझिम हसवारे, छाया म्हात्रे, युवक अध्यक्ष फैसल गीते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
“गाववाडी आणि वस्तीचा सर्वांगीण विकास आम्ही केला आहे. उर्वरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता असणे काळाची गरज आहे.”
— खासदार सुनील तटकरे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *