कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढलेला संघर्षपथ — डॉ. बाबा आढाव यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
पुणे, दि. १० :(प्रतिनिधी )
मेहनतकश आणि वंचित वर्गाच्या हक्कासाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहून पार्थिवाचे दर्शन घेतलं आणि पुष्पचक्र अर्पण करून कृतज्ञ श्रद्धांजली वाहिली.

अंत्यसंस्कार वेळी राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार चेतन तुपे, पोलीस उपायुक्त कृषिकेष रावले, एसडीओ विठ्ठल जोशी, पुणे शहर तहसीलदार स्मिता माने व हवेली तहसीलदार अर्चना निकम आदींनी उपस्थित राहून मोठ्या समाजभानाने आयुष्य जगलेल्या या थोर व्यक्तिमत्त्वाला अंतिम मानवंदना दिली.
अजित पवार म्हणाले, “डॉ. बाबा आढाव यांनी कष्टकरी, श्रमिक आणि वंचित घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. रिक्षा-हमाल-माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली. शिवराय, शाहूराजे, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारसरणीला धरून त्यांनी आयुष्यभर मार्गक्रमण केलं. महाराष्ट्राने एका खऱ्या संघर्षयोद्ध्याला गमावलं आहे.”
यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आढाव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पत्नी शीलाताई आढाव, मुलगे असीम आणि अंबर आढाव यांनी उपस्थित राहून पाहुण्यांचे आभार मानले.
डॉ. आढाव यांच्या निधनाने कामगार चळवळीतील एक युग संपल्याची भावना समाजात उमटताना दिसत आहे.

