स्वच्छता अभियानात अग्रस्थानी असलेल्या मलकापूर नगरपंचायतीचे ‘तीन तेरा’ – सांडपाणी थेट रस्त्यावर!
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपंचायत ही स्वच्छता अभियानात नेहमीच अग्रेसर मानली जाते. कर आकारणीमध्ये सर्वात जास्त उत्पन्न मिळवणारी नगरपंचायत म्हणून मलकापूरची गणना होते. यामुळे रोज नित्य नियमाने कचरा संकलन, रस्त्यांची स्वच्छता या कामात नगरपंचायतीचे कर्मचारी सक्रिय असतात. परंतु, या नगरपंचायतीच्याच दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरत आहे.
मलकापूर शहराच्या हद्दीतील कोल्हापूर नाक्यावर असलेल्या सार्वजनिक मुतारीमधील सांडपाणी थेट रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. या गर्दीच्या भागातून दररोज शेकडो नागरिक, वाहनधारक, तसेच आगाशिवनगर, मलकापूर आणि अन्य तालुक्यातील चाकरमानी प्रवास करत असतात. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे व अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्वच्छतेचे गोड गोड दाखले देणाऱ्या नगरपंचायतीकडून अशा प्रकारची गंभीर निष्काळजीपणा होणे म्हणजे ‘तीन तेरा’ वाजवणारे वास्तव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्वच्छ भारत अभियानाचे गोडवे गात असतानाच शहरात अशा प्रकारे सांडपाणी रस्त्यावर येणे ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची स्पष्ट साक्ष असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी तातडीने या समस्येवर उपाययोजना कराव्यात, कोल्हापूर नाका परिसरातील सांडपाणी बंदोबस्त लवकरात लवकर व्हावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
👉 मलकापूर नगरपंचायतीने तातडीने लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अन्यथा स्वच्छता अभियानातील त्यांची सर्व ‘प्रतिष्ठा’ धुळीस मिळेल, अशी चर्चा नागरिकांत रंगली आहे.

