काॅलेज रस्त्यावरील खड्डा अखेर पोलिसांनीच मुजवला! उंब्रज पोलिसांच्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

प्रतिनिधी – कुलदीप मोहिते, उंब्रज
कराड तालुक्यातील उंब्रज येथील काॅलेज रोड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसाठी अक्षरशः अवघड व जीवघेणे ठरत होते. विशेषतः शेवाळे इलेक्ट्रिकल्ससमोर पडलेला प्रचंड खड्डा अपघातांना आमंत्रण देत होता.

या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उंब्रज पोलिसांनीच पुढाकार घेऊन नागरिकांसाठी आदर्श ठेवला. गुरुवारी सकाळीच पोलिस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी पाटील यांनी खड्ड्यात भराव टाकून रस्ता समतल केला. या कृतीचे नागरिकांनी कौतुक करत “पोलिस म्हणजे केवळ कायदा अंमलबजावणी करणारे नाहीत, तर समाजहिताचे रक्षणकर्ते आहेत,” अशी प्रतिक्रिया दिली.

ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. भोरे यांनी यापूर्वीही सामाजिक भान जपत नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ उपाय केले आहेत. त्यांनी या रस्त्याची अवस्था संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, हा कॉलेज रोड परिसर अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर शैक्षणिक संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुधन केंद्र तसेच व्यावसायिक दुकाने असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी व रुग्ण यांची वर्दळ असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पाईपलाईन व इतर खोदकामांनंतर रस्ता दुरुस्त न झाल्याने तो खड्डेमय बनला आहे.

दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर दुचाकी अपघातात दहावीतील विद्यार्थी जखमी झाल्याने नागरिकांत तीव्र नाराजी होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची योग्य दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

उंब्रज पोलिसांनी दाखवलेली ही कृती केवळ कर्तव्य पार पाडण्यापलीकडची जबाबदारी आहे. त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेमुळे परिसरात सध्या अपघाताचा धोका कमी झाला असून, “खड्डा बुजवला पण नागरिकांचा विश्वास जिंकला”, अशी प्रशंसा सर्वत्र केली जात आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *