उंब्रज-पाटण मार्गाची दयनीय अवस्था; खड्ड्यांनी वाहनचालकांचे व प्रवाशांचे हाल

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक:अहमद मुल्ला
उंब्रज, प्रतिनिधी | कुलदीप मोहिते –

कराड तालुक्यास पाटण व कोकणाशी जोडणारा एक महत्त्वाचा प्रवासमार्ग म्हणजे उंब्रज-पाटण रस्ता. हा रस्ता केवळ पाटणपुरता मर्यादित नसून चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या कोकणवासीयांसाठीही महत्त्वाचा पर्याय आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले असून, रस्ता अक्षरशः चाळण झाला आहे.

रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता प्रचंड वाढली आहे. पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे झाकले जातात आणि वाहनचालकांना अंधारात त्यांचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी तर खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांची तोल गेल्याने गंभीर अपघातही झाले आहेत.

या रस्त्यावर अनेक शाळा असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची सतत वर्दळ असते. शाळकरी मुले सायकलने किंवा पायी प्रवास करत असतात. खड्डे चुकवण्यासाठी अनेकदा लहान मुले विरुद्ध बाजूने येतात, त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. वाहनचालकांनाही अशा अवस्थेत अत्यंत काळजीपूर्वक गाड्या चालवाव्या लागतात.

स्थानिक नागरिक, पालक आणि वाहनचालक यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. “रस्ते वारंवार दुरुस्त केले जात असले तरी ते तात्पुरतेच असतात. हे खड्डे पुन्हा पुन्हा पडत राहतात. मग या ठेकेदारांवर कारवाई का केली जात नाही?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार व कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.

व्यावसायिक वाहनचालक सांगतात की, “आम्ही सर्व कागदपत्रे आणि कर वेळेवर भरतो, तरीही जर रस्त्याची अवस्था दयनीय असेल तर सरकारने ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी.” बदलत्या सरकारी धोरणांमुळे व्यावसायिकांवरही आर्थिक परिणाम होत असून, ते अधिक त्रस्त झाले आहेत.

हे विशेष उल्लेखनीय आहे की राज्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा पाटण हा मतदारसंघ आहे. ते स्वतः याच रस्त्याने प्रवास करतात. तरीही या रस्त्याची दुर्दशा का थांबत नाही? हा देखील नागरिकांमधून विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. पालकमंत्र्यांनी तात्काळ या रस्त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *