महिलांसह आपण सर्वांनी सावित्रीमाईंच्या प्रती कृतज्ञ असायला हवे. ; एम डी चंदनशिवे
म्हसवड
आजच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक जीवनाचे ऐतिहासिक शिल्पकार असणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या उपकारांची आज स्त्रियांना आठवण करुन द्यावी लागावी हे दुःखदायक असून,आजच्या आधुनिक भारतात सर्वोच्च पदावरील महिलांसह आपण सर्वांनी सावित्रीमाईंच्या प्रती कृतज्ञ असायला हवे.असे परखड मत मुख्याध्यापक व इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य एम डी चंदनशिवे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाच्या अनुषंगाने वरकुटे-मलवडी ता.माण येथील सामाजिक सभागृहात क्रांतिज्योती शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था,समस्त ग्रामस्थ,जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा,यशवंतराव चव्हाण हायस्कूल,यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच विलास खरात,माजी डीवायएसपी दत्तात्रय सोनवणे, सेवानिवृत्त एसीपी सुरेश जाधव,डॉ.नानासाहेब रूपनवर,तेजा जाधव,संजय जगताप,सुलभाताई जाधव,बाळासाहेब आटपाडकर सिकंदर इनामदार, सदाशिव बनगर,चेतन बनसोडे,अरुण वणवे,शांताराम जाधव,बबन जाधव,सिद्धार्थ बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.चंदनशिवे पुढे म्हणाले की,ज्या सावित्रीमाई आणि जोतिबा फुले यांनी भारताच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून क्रांती केली,त्यांच्याच विचाराने पुढे संविधानात शैक्षणिक तरतुदी झाल्या.यामुळे गावोगावी शाळा निर्माण होऊन देशात शैक्षणिक क्रांती उदयास आली. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते असल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्था’ निर्माण केली.सामाजिक क्रांतीसाठी आयुष्य त्यागणारे फुले दाम्पत्य जगातील आदर्श उदाहरण आहे,असेही त्यांनी सांगितले.सावित्रीमाईंनी विधवा महिलांच्या केशवपन विरूद्ध आंदोलन केले.स्त्री-विरोधी रूढीपरंपरेविरुद्ध आवाज उठवून,महिलांना सन्मानाने जगण्याची संधी देणाऱ्या सावित्रीमाईंचे कार्य हे तमाम महिलावर्गांसाठी ऊर्जाकेंद्र आहे.वंचित घटकांच्या घरोघरी शिक्षणाची गंगा पोहचविणारे महात्मा फुले यांचा जन्मदिवसच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हायला हवा असे सांगून सुरेश जाधव यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांसह पुस्तकें भेट दिली.दत्तात्रय सोनवणे यांनी प्राचीन भारतातील महापुरुषांचे खरेखुरे ऐतिहासिक प्रसंग सांगितले,सरपंच विलास खरात,दिपाली आटपाडकर,आप्पा सरतापे यांनीही आपले विचार व्यक्त केले.जयंती सोहळ्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, महिलांच्या उपस्थितीत महामानवांच्या प्रतीमांसह गावच्या मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली.क्रांतिज्योती सामाजिक संस्था व ग्रामस्थ यांच्या वतीने वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणासह,सर्व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.सूत्रसंचालन सिद्धार्थ सरतापे व प्रा सागर लोखंडे यांनी केले.तर शेवटी आभार पोपट लोंढे यांनी मानले.कार्यक्रमात यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुण युवकांनी मोलाचे सहकार्य केले…..