म्हसवड निवडणुकीत ‘राजेमाने वि. भाजपा’ थेट सामना; नगराध्यक्ष पदासाठी कोट्यवधींची उधळण, शहरात राजकीय वादळ

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड प्रतिनिधी

म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीचे राजकारण अक्षरशः तापले असून राजेमाने कुटुंबाच्या अचानक झालेल्या पुनरागमनामुळे संपूर्ण समीकरणे बदलली आहेत. गेल्या दशकभरापासून राजकारणापासून दूर असलेले अजितराव राजेमाने यांचे कुटुंब पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याने भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

म्हसवड शहरात राजे घराण्याचे प्रचंड वर्चस्व आणि सर्व समाजांत ठोस पकड असल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी राहणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यातच सर्वपक्षीय आघाडी उभी राहताच मुकाबला आणखी रंगतदार बनला आहे.

        यंदाचे नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव असल्याने सक्षम उमेदवार मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांची धडपड सुरू होती. त्यावर मात करत तेजसिंह राजेमाने यांनी पत्नीला थेट मैदानात उतरवण्याचा निर्णय घेताच चुरस कमालीची वाढली आहे. दोन्ही बाजूंकडून ‘सक्षम महिला उमेदवार’ शोधण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे.

      शहरातील सर्वाधिक मतदान असलेल्या धनगर समाजाने नगराध्यक्षपदाची जोरदार मागणी सुरू केली असून माळी समाजाकडूनही उमेदवाराच्या दावेदारीसाठी मोठा दबाव आहे. ही दोन्ही समीकरणे अधिक गुंतागुंत निर्माण करत आहेत.

        दरम्यान, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः योग्य उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केल्याने भाजपामध्येही हालचाली वेगाने वाढल्या आहेत. गावोगावी भाजपच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असला तरी उमेदवार निवड प्रक्रियेत कोट्यवधींची उधळण सुरू असल्याची चर्चाही जोरात आहे. पक्षांतर्गत तिकीटासाठीच ‘कोटींचे व्यवहार’ होत असल्याच्या कुजबुजेमुळे सर्वसामान्य मतदार नाराज झाले आहेत.

        दोन्ही आघाड्यांकडून अधिक आर्थिक बळ असलेल्या उमेदवारांचा शोध घेतला जात असल्याने गरीब, कार्यशील व चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना पसरली आहे. निवडणूक आता व्यक्तिमत्त्वावर नव्हे, तर पैशांच्या जोरावर लढवली जात असल्याचा आरोप शहरभर चर्चेत आहे.

        वोटखरेदीच्या वाढत्या प्रथेमुळे गरीब मतदारांचे महत्त्व कमी होत चालल्याची चिंता व्यक्त होत असून अशा व्यवहारांना आळा घालण्यासाठी सक्षम कायदे करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. श्रीमंत-गरीब या दरीची निवडणूक राजकारणात अधिक तीव्रता वाढत असून, “लोकशाही धोक्यात” अशीही चर्चा रंगू लागली आहे. 

    म्हसवडची ही निवडणूक केवळ नगराध्यक्षपदाची नाही, तर पैशाविरुद्ध लोकशाही, वर्चस्वाविरुद्ध सर्वसामान्य यांच्यातील एक निर्णायक लढाई ठरत आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *