उंब्रज रस्त्याची दयनीय अवस्था : मनसेचा प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज (ता. कराड) : प्रतिनिधी
उंब्रज परिसरातील नितीराज पेट्रोल पंप ते पाटण-उंब्रज रस्ता, शुभम पेट्रोल पंप ते तारळे पुलापर्यंतच्या मुख्य रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली असून, रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. आठ दिवसांत रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या रस्त्यावर इतके खड्डे आहेत की रस्ता आहे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. पावसामुळे खड्डे पाण्याने भरत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहनधारकांसह शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका व पादचाऱ्यांसाठी देखील हा रस्ता धोकादायक बनला आहे.
रस्त्याच्या दयनीय अवस्थेचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अभिनव पद्धतीने आंदोलन केले. हे आंदोलन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी होते, असे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अमित राजसाहेब ठाकरे व सातारा जिल्हा सचिव मा. श्री. अमोल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनावर तालुका अध्यक्ष रणजीत कदम, शहर अध्यक्ष विजय वाणी, बंडा साळुंखे, मंगेश चव्हाण व अमोल कांबळे यांची सही असून, जर प्रशासनाने आठ दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीची कोणतीही ठोस कारवाई केली नाही तर मनसेच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

