सिद्धनाथ हायस्कूलमध्ये ‘आधुनिक शेती व तंत्रज्ञान’ कोर्स सुरू; एमकेसीएल व माणदेशी फाउंडेशनचा उपक्रम
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड :प्रतिनिधी
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) आणि माणदेशी फाउंडेशन म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड येथे ‘आधुनिक शेती व तंत्रज्ञान’ या अभिनव पायलट प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे व शेतीच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी निर्माण करणे असा असून, इयत्ता नववीपासून बारावीपर्यंत चार वर्षांचा हा विशेष कोर्स राबवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला एमकेसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. विना कामथ, सल्लागार श्री. श्रीनिवास खेर, श्री. उत्कर्ष घाटे, श्री. नियाज मुलाणी, माणदेशी फाउंडेशनचे श्री. करण सिन्हा, सौ. पूनम सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेचे प्राचार्य प्रवीण दासरे, उपप्राचार्य पी.के. यादव, शिक्षक प्रतिनिधी श्री. संतोष देशमुख, श्री. अमोल म्हेत्रे, श्री. प्रविण भोते, सौ. सुजाता मोहिते यांचाही कार्यक्रमात सहभाग होता.
या कोर्समध्ये आठवड्यातून दोन दिवस ऑनलाइन एक तास शिक्षण व दोन दिवस प्रत्यक्ष शेतावर जाऊन प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यावसायिक विकासासाठी सॉफ्ट स्किल्स, टेक्निकल स्किल्स आणि काँग्निटिव्ह स्किल्सवर भर दिला जाणार आहे.
कोर्सची संकल्पना व उद्दिष्टे श्री. करण सिन्हा व सौ. विना कामथ यांनी उपस्थितांसमोर मांडली, तर श्री. नियाज मुलाणी यांनी सविस्तर माहिती व सादरीकरण केले. प्राचार्य प्रवीण दासरे यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले. कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमकेसीएलकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अमोल म्हेत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. संतोष देशमुख यांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाला लाभला.