म्हसवड येथील रस्ता बांधकामावर अधिकाऱ्याचा अंकुश का नाही ? विश्वंभर बाबर
व्हिजन २४ तास न्यूज
BY ;Ahmad Mulla
म्हसवड... प्रतिनिधी
म्हसवड येथील सुरू असणाऱ्या सातारा पंढरपूर हायवे च्या कामावर अधिकाऱ्याचा अंकुश का नाही ? अशी लेखी विचारणा कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ पुणे कार्यालयाकडे समक्ष केली आहे.
म्हसवड येथे सातारा पंढरपूर हायवे क्रमांक १४१ या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.या बांधकामावर अनेक प्रकारच्या तक्रारी असून काम निकृष्ट प्रतीचे होत असल्याने त्याबाबतचे लेखी निवेदन रस्ते विकास महामंडळ पुणे कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता अश्विनी घोडके यांना कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी समक्ष दिले.
सातारा पंढरपूर या हायवेचे म्हसवड शहरालगत बांधकाम सुरू आहे.यापूर्वीच्या कालावधीत कोणतेही रस्ते डांबरीकरण्याची अथवा इतर शासकीय कामे सुरू असताना त्यावर अधिकाऱ्याचा अंकुश असायचा. अधिकारी त्या ठिकाणी समक्ष उपस्थित राहायचे. मात्र सध्या सुरू असणाऱ्या कामावर अधिकाऱ्याचा कसलाच अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. ट्राफिक आहे या नावाखाली सदर रस्त्याचे काम प्रामुख्याने रात्रीच्या वेळी उरकण्यात आलेले आहे , याचे गुपित काय ? त्याच बरोबर बहुतांशी काम पेवर मशनरी ऐवजी मजुरा कडून
करून घेतले असल्याने त्याचा समपातळी पणा रहात नसून दर्जा ही निकृष्ट होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की सदर रस्त्याच्या दोन थरापैकी खालच्या थराचे मटेरियल अत्यंत निकृष्ट असून सिमेंटचा दर्जा व प्रमाण कमी असल्याने वाळू व खडीचे तुकडे लगेचच मोकळे झालेले दिसून आलेले आहेत.
रस्ता कॉंक्रिटीकरण झाल्यानंतर त्या कामावर नियमितपणे व पुरेशा प्रमाणात पाणी मारणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.पाणी मारण्याबाबत केवळ दिखाऊपणा केला जात आहे.
सदर रस्त्याचे काम हे आगामी काही दशकासाठी असून ते वरचेवर होणारे नाही.यासाठी कामाचा दर्जा उत्तम ठेवणे अपेक्षित आहे. ठेकेदार काम करतोय म्हणजे उपकार करीत नाही.त्यासाठीचा पैसा हा जनतेच्या कर संकलातून उपलब्ध झालेला आहे. म्हसवड साखळी पुल ,व दिवड वनीकरण नजीक अपूर्ण रस्ता बांधकामामुळे वाहनधारक व प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत असल्याने सदर काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे.
म्हसवड येथील हायवे रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याने त्यावर अंकुश ठेवावा तसेच ठेकेदाराने निकृष्ट केलेल्या कामाची चौकशी करून त्याच्यावर कङक कारवाई करण्याची मागणी प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके यांच्याकडे केली आहे.