सातारा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली यशस्वी कारवाई: परदेशी ई-सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचा 10.41 लाखांचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
सातारा : सातारा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या परदेशी ई-सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्याची यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 10,41,500 रुपयांच्या मूल्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये विविध ब्रँडच्या ई-सिगारेट्स आणि तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. ही कारवाई पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या प्रकारातील पहिली मानली जात आहे.
पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणूक आचारसंहिता व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर “कोम्बिंग ऑपरेशन” राबविण्यात आले. या विशेष ऑपरेशनमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, स.पो.नि. सुधीर पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भाग घेतला.
दि. 01 नोव्हेंबर 2024 रोजी सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत हायवे जवळील महिंद्रा शोरुम परिसरात संशयास्पद स्थितीत एक इसम दोन पोत्यांसह आढळून आला. त्याची चौकशी केल्यावर त्याच्याजवळ भारतात प्रतिबंधित असलेल्या विविध विदेशी बनावटीच्या ई-सिगारेट्स आणि तंबाखूजन्य वस्तू असल्याचे आढळून आले. मुद्देमालामध्ये Youto Thanos 5000, Elfbar RayaD2 Disposable Pod Device, Davidoff White Slims, Dunhill Switch, Phillies Blunt, Golden Virginia आणि Natural American Spirit अशा विविध प्रकारच्या सिगारेट्स आणि तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे परराज्यातील एक संशयित इसम ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, आणि पोलीस उप-अधीक्षक श्री. अतुल सबनीस यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.