म्हसवड…प्रतिनिधी शालेय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्वच्छता मॉनिटर स्पर्धेत म्हसवड येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेने राज्यात सहावा क्रमांक पटकावला असून या उपक्रमात सातत्य ठेवले आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत गेल्या दोन वर्षापासून स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवला जात आहे. शैक्षणिक वर्ष 2024 ते 20 25 स्वच्छता मॉनिटर पहिल्या टप्प्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून क्रांतिवीर नागनाथ नायकवडी शाळा म्हसवड ने सातत्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थी मॉनिटर ने आपल्या रहिवास क्षेत्रात कचरा व अस्वच्छता करण्यापासून रोखणे, त्याबाबत जनजागृती करणे , त्याचे व्हिडिओ चित्रण करणे, ते व्हिडिओ मिडिया, इंस्टाग्राम व फेसबुक वर अपलोड करणे तसेच कचरा होऊच नये म्हणून काळजी घेण्याचे प्रबोधन करणे या क्षेत्रात क्रांतिवीर शाळेने वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्कृष्ट काम केले आहे. या कार्याची दखल घेऊन झालेल्या राज्यस्तरीय परीक्षणात क्रांतिवीर शाळेने राज्यात सहावा क्रमांक पटकविला आहे. स्वच्छता मॉनिटर उपक्रमा अंतर्गत सन 2023 या वर्षात राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातून उत्कृष्ट शंभर शाळा निवडल्या होत्या.त्यावेळी तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच राज्य शिक्षण सचिव यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचा सन्मान मुंबई येथे झाला होता. या स्पर्धेबरोबरच नुकत्याच संपन्न झालेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेतही क्रांतिवीर शाळेने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर तसेच सहकारी शिक्षक टीम यांचे ज्ञानार्जना बरोबरच विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असल्याने शाळेचा नावलौकिक दिवसे दिवस वाढत असल्याचे दिसत आहे. उपशिक्षिका आलीशा शकील मुल्ला यांनी स्वच्छता मॉनिटर उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. राज्यस्तरीय यशाबद्दल विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचे अभिनंदन केले आहे.