म्हसवडमध्ये गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न – एपीआय अक्षय सोनवणे म्हणाले, “माणच्या मातीतील रक्तातच संघर्ष!”

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड –प्रतिनिधी

माण तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना, “या मातीच्या लोकांच्या रक्तातच संघर्ष आहे,” असे ठाम विधान म्हसवड पोलीस ठाण्याचे एपीआय अक्षय सोनवणे यांनी केले. ते अहिंसा पतसंस्थेत आयोजित गुणवंतांच्या सत्कार समारंभात अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते.

या कार्यक्रमात एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून महसूल सहाय्यक पदावर नियुक्त झालेल्या सचिन दिलीप लोखंडे यांचा व प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या चि. शंभूराज दीपक मासाळ यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात एपीआय सोनवणे यांच्या शाल, श्रीफळ व फेटा देऊन स्वागताने झाली. यानंतर दोन्ही गुणवंतांचा त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ज्ञानवर्धिनी हायस्कूलचे माजी प्राचार्य जी. डी. मासाळ सर यांनी नितीनभाई दोशी यांच्या कार्याचे कौतुक करत म्हटले की, “नितीनभाईंनी घेतलेले पहिले सत्कारच पुढे अधिकारी घडवतात.”

शंभूराज मासाळ यांचे वर्गशिक्षक मा. बिरादार सर यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, “या भागातील मुलांची आकलनशक्ती इतकी तीव्र आहे की एकदा शिकवलं की परत शिकवण्याची गरज भासत नाही.” आपल्या विद्यार्थ्यामुळे आपलाही गौरव झाला हे विशेष समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

पतसंस्थेचे प्रमुख व माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी भावनिक भाषणात सांगितले की, “सत्कार म्हणजे केवळ गौरव नव्हे, तर प्रेरणा आहे. समाजातील इतरांनीही असे यश मिळवावे, यासाठी हे आयोजन आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, महसूल क्षेत्रातील अधिकाऱ्याचा सत्कार पोलीस अधिकाऱ्याच्या हस्ते होणे, ही एक दुग्धशर्करा संयोगाची घटना आहे.

अध्यक्षीय भाषणात एपीआय अक्षय सोनवणे यांनी माण तालुक्याच्या संघर्षमय इतिहासाचे आणि सध्या येथे कार्य करताना मिळालेल्या अनुभवाचे उल्लेख करत म्हटले की, “येथील माणसांमध्ये असलेली चिकाटी, जिद्द आणि परिश्रमाची तयारी पाहता, त्यांचे यश केवळ वेळेची गरज असते.” त्यांनी नितीनभाई दोशी यांच्या कार्याचेही कौतुक केले आणि त्यांच्या सामाजिक उपक्रमांना खऱ्या अर्थाने समाजोपयोगी असल्याचे म्हटले.

कार्यक्रमात ऍड. भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी तर आभार प्रदर्शन नीरज व्होरा यांनी केले. कार्यक्रमास नागरिक, पालक, शिक्षक आणि पतसंस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!