स्कॉलर अकॅडमी मधून घडतील भविष्यातील चांगले अधिकारी – सपोनि अक्षय सोनवणे यांचा विश्वास
व्हिजन २४ तासन्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड प्रतिनिधी –
म्हसवड शहरातील स्कॉलर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या गुणवत्तेचा ठसा उमठवला आहे. शालेय जीवनात विविध स्पर्धा परीक्षा देणारे हे विद्यार्थी भविष्यात समाजासाठी योग्य अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते घडतील, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी व्यक्त केला.

स्कॉलर अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी अशोक राऊत, मंगेश शेटे, राजेश देठे व दिपेश लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात स्कॉलर अकॅडमीच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील उज्वल यशाचा आढावा घेण्यात आला.
यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामध्ये तनिष्का दत्तात्रय शेळके हिची निवड झाली. तर शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का शेळके हिने 300 पैकी 262 गुण, हेमा सतीश दीडवाघ हिला 252 गुण, व श्रेया सचिन विरकर हिला 250 गुण मिळाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत शिष्यवृत्ती मिळवली आहे.
या यशामागे स्कॉलर अकॅडमीचे मार्गदर्शक प्रवीण लोखंडे सर व माधवी राऊत मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अचूक नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि वैयक्तिक लक्ष या तत्त्वांवर आधारित स्कॉलर अकॅडमीने अल्पावधीतच विश्वासार्ह शिक्षणसंस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे.
अक्षय सोनवणे यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, “स्कॉलर अकॅडमी ही फक्त अभ्यासापुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचे काम करते. याच संस्थेतून भविष्यातील प्रशासकीय अधिकारी, समाजसेवक घडणार आहेत, याचा मला पूर्ण विश्वास आहे.”
चौकट
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार व भव्य मिरवणूक
कार्यक्रमानंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शहरातून ही मिरवणूक वाजतगाजत काढण्यात आली असून विद्यार्थ्यांचे फलक, आकर्षक घोषवाक्य आणि पालकवर्गाचा उत्स्फूर्त सहभाग या मिरवणुकीची विशेष वैशिष्ट्ये ठरली. मिरवणुकीने संपूर्ण म्हसवड शहरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण केले.