माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना उघडकीस आली आहे, जिथे रस्त्यात खेळत असलेल्या पुतण्याला बाजूला हो, असे सांगूनही न ऐकल्याच्या रागातून चुलत्याने चार वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याचा दगडाने ठेचून खून केला. या भयानक घटनेमुळे संपूर्ण माण तालुक्यात खळबळ उडाली असून, आरोपी चुलता आकाराम धोंडीराम गाढवे (वय ३५) याला म्हसवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवतेज सचिन गाढवे (वय ४) असे हत्या झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. शिवतेज अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत होता आणि त्याला मेंढरांचा खूप लळा लागला होता. दररोज मेंढरं घरी परत येण्याच्या मार्गावर तो खेळायला जात असे. शुक्रवारी सायंकाळी, शाळेतून परतल्यानंतर शिवतेज महाबळेश्वरवाडी ते काळचौंडी रस्त्यावर गेला होता, तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली.
घटनेचा तपशील
आरोपी आकाराम गाढवे आपल्या मेंढ्यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यात शिवतेज खेळत बसला होता. मेंढ्यांना अडथळा होऊ नये म्हणून चुलत्याने शिवतेजला बाजूला होण्याचे सांगितले, परंतु शिवतेजने ऐकले नाही. त्यामुळे मेंढरे इतरत्र पळू लागली. यामुळे रागाच्या भरात चुलत्याने लहान मुलाचा निर्दयतेने खून केला. आकारामने मोठा दगड उचलून शिवतेजच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, श्रीपती गाढवे हे मेंढरं घरी घेऊन येत असताना रस्त्यापासून काही अंतरावर पाझर तलावाच्या सांडव्याच्या पायथ्याशी शिवतेजला तलावाजवळ पालथ्या अवस्थेत पडलेले पाहिले. त्याच्या डोक्यात, पाठीत, हनुवटीवर, आणि कपाळावर गंभीर जखमा दिसत होत्या आणि त्यातून रक्तस्त्राव होत होता. यावेळी संशयित आकाराम हा घरी जात होता. त्यामुळे श्रीपती यांनी त्याला बोलावले. तसेच त्यांनी याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर सर्वजण घटनास्थळी आले. सर्वांवनी शिवतेजला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिस तपास आणि आरोपीची कबुली
घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकारी, सपोनि सखाराम बिराजदार आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला. पोलिसांनी श्रीपती गाढवे आणि आरोपी आकाराम गाढवे यांच्याकडे चौकशी केली. आकारामच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्यानंतर, त्याने खुनाची कबुली दिली.
आरोपीने कबूल केले की, मेंढ्यांना घरी नेत असताना शिवतेजने त्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. यामुळे मेंढरे पळून गेल्याच्या रागातून त्याने दगडाने शिवतेजचे डोके ठेचून त्याचा खून केला. या भयंकर कृत्याच्या वेळी आकारामचा मुलगाही सोबत होता, ज्याला कोणतीही माहिती बाहेर सांगितल्यास जीव मारण्याची धमकी दिल्याचेही त्याने कबूल केले.
या भयंकर घटनेमुळे शिवतेजच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदयद्रावक होता. संपूर्ण गावात या घटनेने संतापाची लाट उसळली आहे, आणि सर्वत्र या कृत्याची निंदा होत आहे. शिवतेजच्या आजोबांनी म्हसवड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे.
या अमानवी कृत्यामुळे माण तालुक्यातील शांततेला धक्का बसला असून, आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.