वनविभागाकडून माण तालुक्याकडे दुर्लक्ष का? कुकडवाड–म्हसवड मार्गावर वृक्षारोपणाचा ‘शून्य’ मागोवा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) –
माण-खटाव वनविभागाकडून माण तालुक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी उपस्थित केला आहे.
खटाव तालुक्यातील मायणी ते कुकडवाड खिंड या दरम्यानच्या रस्त्याकाठाने विभागाकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. या मार्गावर दुतर्फा उंच, शोभिवंत आणि सावली देणाऱ्या हजारो झाडांची रांग तयार झाली असून परिसराचे सौंदर्य खुलले आहे.
मात्र, याच रस्त्याचा पुढील टप्पा — कुकडवाड खिंड ते म्हसवड — माण तालुक्याच्या हद्दीत आल्यानंतर मात्र चित्र पूर्णपणे बदलते. या मार्गावर वृक्षारोपणाचा कुठलाही मागमूस नाही. शासनाच्या सेवा पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने वैशिष्ट्यपूर्ण काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पण माण-खटाव मधील वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग मात्र विकासकामांपासून अलिप्त राहिल्याचे चित्र दिसते.
कृषिरत्न बाबर यांनी सांगितले की, “कुकडवाड–म्हसवड या दरम्यानच्या रस्त्यावर मायणीप्रमाणे वृक्षारोपण झाले, तर पर्यावरण पूरक बदल घडून येईल. यंदा परिसरात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. त्यामुळे वृक्षारोपणासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने या मार्गावर अग्रक्रमाने झाडे लावावीत,” अशी त्यांनी मागणी केली.
वृक्षप्रेमी नागरिकांनीही वनविभागाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्षात हरित उपक्रम हाती घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

