अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा संताप — अर्धापूर येथे भव्य रास्तारोको आंदोलन तातडीने कर्जमाफी, हेक्टरी एक लाख मदत, विम्याची रक्कम तत्काळ द्यावी अशी मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

नांदेड (अर्धापूर)
प्रतिनिधी उध्दव सरोदे–
मराठवाड्यातील भीषण अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकात सोमवारी (ता. ६) भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिसर घोषणाबाजींनी दणाणून गेला होता. संतप्त शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “कर्जमाफी द्या”, “विमा त्वरित द्या” अशा घोषणा देत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

तालुक्यातील सततच्या पावसामुळे केळी, सोयाबीन, कापूस, मका, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतले पीक वाहून गेले आहे. पिकांसह जनावरेही पाण्यात वाहून गेल्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या —

🔹 हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी.
🔹 केळी व सोयाबीन पिकांचा विमा मंजूर करून तत्काळ रक्कम द्यावी.
🔹 जनावरे वाहून गेलेल्या पशुपालकांना ७० हजार रुपये मदत देण्यात यावी.
🔹 शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे.
🔹 पडझड झालेल्या घरांना एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी.
🔹 शेतमालाला वाढीव हमीभाव देण्यात यावा.
🔹 खरडून गेलेल्या शेतीच्या दुरुस्तीसाठी हेक्टरी ५० हजार मदत देण्यात यावी.

शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की, या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत तर पुढील काळात शासनाविरुद्ध आणखी तीव्र आंदोलन, मोर्चे, जाळपोळ, आमरण उपोषण व दंगलसदृश प्रकार घडू शकतात.

स्थानिक प्रशासनाने आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून तहसीलदारांनी निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.

👉 शेतकऱ्यांचा आक्रोश: “अतिवृष्टीने पिकं वाहून गेली, आता शासनाची मदतही न मिळाल्यास जगावं कसं?”

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *