दहिवडी पोलिसांची उत्कृष्ठ कामगिरी — चोरीस गेलेली मालमत्ता सर्वाधिक प्रमाणात हस्तगत; सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्याचा सन्मान!
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
दहिवडी प्रतिनिधी |
सातारा जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरीची एक नवी नोंद दहिवडी पोलीस ठाण्याच्या नावावर झाली आहे. मे २०२५ या महिन्यात दहिवडी पोलिसांनी चोरीस गेलेली मालमत्ता मोठ्या प्रमाणात हस्तगत करत जिल्ह्यात सर्वोच्च स्थान पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल “सर्वोत्कृष्ट चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करणारे पोलीस ठाणे” असा विशेष पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन दहिवडी पोलीस ठाण्याचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी (भा.पो.से.) यांच्या हस्ते दहिवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी व पत्रकारांची उपस्थिती होती.
दहिवडी पोलिसांनी आपल्या काटेकोर तपास, स्थानिक माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर, आणि नागरिकांच्या सहकार्याने अवघ्या काही दिवसांत चोरी गेलेल्या मालमत्तेचा शंभर टक्के शोध घेतला. ही मालमत्ता संबंधित मालकांना परत करण्यात आली आहे, हे विशेष उल्लेखनीय.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी यावेळी बोलताना म्हटले की, “दहिवडी पोलिसांचे हे कार्य संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. चोरीचे प्रकार रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता व कर्तव्यनिष्ठा ही आदर्शवत आहे. भविष्यातही अशीच कामगिरी अपेक्षित आहे.”
दहिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक नागरीकांनीही या यशाबद्दल समाधान व्यक्त करत पोलीस दलाचे आभार मानले आहेत.
दहिवडी पोलीस ठाणे – सातारा जिल्ह्याचा अभिमान!