“ज्ञानदीप प्रज्वलित ठेवणाऱ्या शिक्षिकेला सलाम” — सौ. योगेश्वरी स्वामी मॅडम यांच्या सेवापूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्याला भावनिक स्वर
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) :
३२ वर्षांचा गौरवशाली शैक्षणिक प्रवास… असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानदीप पेटवणारी प्रेरणादायी शिक्षिका… शिस्तप्रिय, अष्टपैलू आणि सदैव हसतमुख व्यक्तिमत्त्व — अशी ओळख असलेल्या सौ. योगेश्वरी अनिलकुमार स्वामी मॅडम यांच्या सेवापूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्यास म्हसवड येथे भावनिक व मंगलमय वातावरण लाभले.

कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या ईशस्तवन सादरीकरणाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खटाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड मॅडम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माण तालुक्याच्या शिक्षण विस्तार अधिकारी शमीम तांबोळी मॅडम, केंद्र प्रमुख दीपककुमार पतंगे,सूर्यवंशी सर माजी केंद्र प्रमुख जगन्नाथ वीरकर, माजी नगराध्यक्षा अंजना वीरकर,शिक्षक बॅंकचे माजी संचालक शेटेबापू,सिद्धेश्वर स्वामी, कांती वीर नागनाथ आण्णा नायकवडी शैक्षणिक संकुलच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सुलोचना बाबर यांची उपस्थिती लाभली
या सोहळ्यात अनेक आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना मॅडम यांच्या कार्याची उजळणी केली. “संस्कार आणि संस्कृती काय असते हे आम्ही मॅडमकडूनच शिकलो”, असे एका माजी विद्यार्थिनीने सांगताना सभागृहात दाटून आलेले वातावरण सर्वांच्या डोळ्यांत दिसले.
उपस्थिती मान्यवरानी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की स्वामी मॅडम यांनी केवळ अध्यापनच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा यामध्ये उत्कृष्ट यश संपादन केले. त्यांच्या सहकार्यशील स्वभावामुळे शाळेचा प्रत्येक उपक्रम उत्साहात पार पडत असे.
त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, प्रेम, आपुलकी आणि समाधान यांचा सुंदर संगम. शिक्षणाला त्यांनी कधीच केवळ नोकरी म्हणून पाहिले नाही, तर सेवा आणि जीवनध्येय म्हणून स्वीकारले. शेवटच्या दिवशीपर्यंत त्याच उमेदीने व हसतमुखाने त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाच्या अखेरीस कार्यक्रमाच्या अध्यक्षा खटाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड व माजी केंद्रप्रमुख जगन्नाथ वीरकर यांच्या हस्ते सौ योगेश्वरी स्वामी मॅडम व श्री अनिलकुमार स्वामींसर यांचा यथोचित सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या, सहकाऱ्यांच्या आणि पालकांच्या मनात एकच भावना होती —
“मॅडम… तुमचं योगदान शब्दात मावत नाही. तुम्ही घडवलेला प्रत्येक विद्यार्थी तुमचं जिवंत स्मारक आहे!”
या कार्यक्रमासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी,विध्यार्थिनी, सौ स्वामी मॅडम व श्री अनिलकुमार स्वामी सर त्यांचा मुलगा डॉ. ऋषींकेश स्वामी व त्यांचे सर्व आपतेष्ठ पाहुणे व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रास्ताविक नंदकुमार साखरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोंजारी सर यांनी मानले

