म्हसवड मधील शाळांनी काढलेल्या माऊलींच्या पालखी दिंडीचे उत्साही स्वागत – अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिनभाई दोशी यांचा पुढाकार
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, प्रतिनिधी
पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध दिंड्या विठोबा-रखुमाईच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत आहेत. अशाच भक्तिभावाने निघालेल्या सिद्धनाथ हायस्कूल , ज्ञानवर्धिनी हायस्कुल, मॉडर्न हायस्कुल, गुरुकुल विद्या मंदिर व जिल्हा परिषद शाळा यांनी काढलेल्या माऊलींच्या पालखी दिंडीचे म्हसवड शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
या विशेष दिंडीचे स्वागत करताना अहिंसा नागरी सह. पतसंस्था मर्या म्हसवड चे चेअरमन व म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या टीमसह दिंडीतील सर्व वारकऱ्यांचे आत्मीयतेने स्वागत करून मोठ्या भक्ती भावाने चीमुकल्यांनी काढलेल्या दिंडीचे दर्शन घेतले या सेवेमागील भावना म्हणजे ‘माऊली म्हणजेच चालते बोलते विठोबा’ आणि त्यांची सेवा म्हणजेच खऱ्या अर्थाने भक्तीची परंपरा जपणे, असे नितिनभाई दोशी यांनी यावेळी सांगितले.
दिंडीतील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषात ही दिंडी म्हसवड मुख्य बाजारपेठेतून सिद्धनाथ मंदिर, यात्रा पटागनातून एसटी स्टॅन्ड मार्गे पुढे मार्गस्थ झाली. अनेक ठिकाणी रांगोळ्यांनी सजवलेले रस्ते आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले.
या उपक्रमात अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीनशेठ दोशी हायस्कुल म्हसवड चे प्राचार्य प्रवीण दासरे,ज्ञानवर्धिनीचे प्राचार्य लुनेश वीरकर, संतोष देशमुख, प्रवीण भोते, दिलीप माने, आदी शिक्षक, अहिंसा पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्था यांचाही मोठा सहभाग होता.
शहरातील अनेक वडीलधारी मंडळी आणि युवा वर्ग देखील या स्वागतासाठी उपस्थित होता. विठ्ठल भक्तीचा हा अनोखा सोहळा पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव व आनंद ओसंडून वाहत होता.
ही परंपरा जपताना आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवताना अशा स्वागत सोहळ्यांमुळे सामाजिक सलोखा आणि अध्यात्मिक बळ वृद्धिंगत होत आहे.