देवापुरकरांना मैदानासाठी दानविराकडून मदतीचा हात
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
गावं करील ते रावं काय करील अशी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे, सध्या याच म्हणीचा प्रत्यय माण तालुक्यातील देवापुर या गावात येत आहे, येथे संपूर्ण गावाने केवळ गावातील व परिसरातील खेळांडुना खेळाचे एक मैदान उभारण्याचा संकल्प सोडत त्यादृष्टीने टाकलेल्या पाऊलाला आज सर्व माण तालुक्यातुन सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे. देवापुरकरांच्या या मेहनतीला व उपक्रमाला म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते इंजि. सुनील पोरे व कुर्ला नागरी सहकारी बँकेचे मा. चेअरमन, मा.शाखा प्रमुख शिवसेना (ठाकरे गट) किसनभाई मदने यांनी क्रिडा मैदान स्थळी भेट देत मदतीचा हातभार लावला.
लोकसहभागातुन गत १० दिवसापासून देवापुर येथे सुरू असलेल्या क्रिडा मैदानच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती दाखवत परिसरातील नागरिक हातभार लावत आहेत. युवकांना विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी व ज्येष्ठांना विरंगुळा मिळावा या उदात हेतूने देवा पूर चे युवक सरसावले आहेत.
यावेळी इंजि.सुनिल पोरे म्हणाले की देशाला महासत्ता बनण्यासाठी युवक, युवतींचा मोठा हातभार आहे. त्यासाठी युवक, युवतींना बौद्धिकते बरोबरच सुदृढ मन व सुदृढ शरीराराची गरज आहे. देवापूर ही एक शिक्षण पंढरी म्हणून नावा रूपाला आली आहे. या ठिकाणी हजारो पर गावचे विद्यार्थी स्थाईक असतात. माञ या ठिकाणी क्रिडा मैदानं उपलब्ध नाही.शिक्षणा बरोबरच क्रिडा क्षेत्रात ही इथला युवा वर्ग चमकावा या उदात्त हेतूने युवक वर्गाने हाती घेतलेले काम कौतुकास्पद आहे. अथलेटीक्स मध्ये एशियन चॅम्पियन ,माणदेश एक्स्प्रेस,ग्रामीण भागांतील मोही या गावची कन्या ललिता बाबर ने ऑलिंपिक ट्रॅक च्या इव्हेंट ला पोचणारी जगप्रसिद्ध धावपटू पी. टी उषा नंतरची देशातील दुसरी धावपटू म्हणून नाव लौकीक मिळवला. तिच्या प्रेरणेने अनेक युवक युवती विविध क्रीडा प्रकारात मार्गक्रमण करतं आहेत. माण मधील युवा वर्ग शिक्षणा बरोबरच क्रिडा क्षेत्रात ही टिकला पाहिजे. त्यासाठी खेडो पाड्यात मैदाने ही टिकली पाहिजेत.
किसन भाई मदने म्हणाले की शहरासारखीच ग्रामीण भागात ही क्रिडा मैदानाची अतिक्रमणामुळे दुरावस्था झाली आहे. आज ही देशात खेळाला प्रचंड महत्त्व आहे. माञ खेळासाठी किंबहुना मैदानासाठी जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांच भविष्य अंधारात असेल. देवापूर करांनी क्रिडा मैदानाचा घेतलेला निर्णय मनाला भावल्याचे गौरोदगार त्यांनी भेटी प्रसंगी काढले.
चौकट –
अंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान उभारण्याचा संकल्प –
गावांमध्ये कोणत्याही मैदानी खेळाचे आयोजन करायचे म्हटले की मैदान हे लागतेच, नेमके हेच देवापुरमध्ये नसल्याची खंत नेहमीच आम्हाला सतावत होती, शेवटी सर्व देवापुरकरांनी एकत्र येवुन गावातच मैदान उभारण्याचा संकल्प केला त्याची सुरुवात केली अन् त्यासाठी सर्वजण योगदान देवु लागल्याने आमचा उत्साह अधिकच वाढला आहे, त्यामुळे आता देवापुरमध्ये अंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान उभारण्याचा संकल्प सर्व देवापुरकरांनी सोडल्याचे देवापुरकर ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.