महिलांच्या सुरक्षिततेसाठी समाजाची सामूहिक जबाबदारी: मलकापूरमध्ये सजग नागरिकांची सामूहिक शपथ

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते
मलकापूर, कराड – प्रतिनिधी

महिलांच्या सुरक्षेसाठी सजगतेचा संदेश देत मलकापूरमध्ये मोठ्या उत्साहात ‘महिला अत्याचार जनजागरण रॅली’ आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दल, सातारा जिल्हा, निर्भया पथक कराड, मलकापूर पोलीस चौकी, श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था, जखिणवाडी आणि श्री मळाईदेवी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूर येथे हा मेळावा पार पडला.

गेल्या काही वर्षांत महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असल्याने, मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी समाजाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्था यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रॅलीचा प्रारंभ आदर्श ज्युनिअर कॉलेजपासून झाला आणि मलकापूरच्या विविध प्रमुख मार्गांवरून जात आदर्श ज्युनिअर कॉलेजमध्ये जनजागरण मेळाव्याच्या रूपात समाप्त झाला.

उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनात समाज माध्यमांच्या चुकीच्या वापरामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे सांगितले. नागरिकांनी सजग राहून स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी एकत्र उभे राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांनी पोलिसांची जबाबदारी आणि सजगता कशाप्रकारे महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे, हे स्पष्ट केले.

या कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी भारतीय संस्कृतीत महिलांना दिला जाणारा सन्मान अधोरेखित केला. श्री मळाई ग्रुपचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी सांगितले की, मलकापूर आणि परिसरातील सजग नागरिकांनी या जनजागरण रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महिलांच्या सुरक्षिततेचा संकल्प केला.

या रॅली आणि मेळाव्याला जवळपास १५०० विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उपस्थिती लावली. संगीत शिक्षक तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी’ या गीताने उपस्थितांच्या भावना जागृत केल्या.

श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा डॉ. स्वाती थोरात यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मंचाचे सातत्याने प्रयत्न सुरू राहतील असे आश्वासन दिले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे विशेष योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.सौ अरुणादेवी पाटील यांनी मेळावा यशस्वी पर पाडल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात रोटरी क्लब, इनरव्हील क्लब मलकापूर यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!