जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट सज्ज – माण तालुक्यात भगवा फडकवण्यासाठी तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुलाणी यांचे नेतृत्वात युद्धपातळीवर तयारी सुरू

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी)
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना, या निवडणुका गट-तट, हेवेदावे विसरून लढवाव्यात असे स्पष्ट आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे. “सगळ्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन संघटन मजबूत करा आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकवा,” असा थेट संदेश त्यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले की — “तुम्हाला मिळालेल्या पदाचा योग्य वापर करून सर्वांना बरोबर घेऊन संघटना वाढवा. गावोगावी झालेला विकास जनतेपर्यंत पोहोचवा. गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे भगवा हीच आपली दिशा असली पाहिजे.” त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आजपासूनच कामाला लागा असे स्पष्ट आदेश दिले.

या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत माण तालुका शिवसेना (शिंदे गट) अध्यक्ष बाळासाहेब मुलाणी यांनी तालुक्यातील संघटन रचना नव्याने सजवून युद्धपातळीवर निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यांनी सांगितले की — “तालुक्यातील सर्व गण व विभाग पातळीवर उमेदवारांची यादी जवळपास तयार झाली आहे. तुल्यबल उमेदवार उभे करून पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार आहोत.”

युवासेना तालुका प्रमुख हनमंत राजगे यांनीही या मोहीमेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. “शिवसेना (शिंदे गट) विचार गावोगावी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात संपर्क मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक गावात भगवा फडकवणे हेच आमचे ध्येय असून तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संघटितपणे लढणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाच्या माध्यमातून शिवसेनेचा संदेश पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम सुरू झाली असून, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माण तालुक्यात भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
शिवसेना (शिंदे गट) च्या या तयारीमुळे येत्या निवडणुकीत माण तालुक्यातील राजकारणात रंगतदार चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *