जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून आले अन गावासाठी ‘सबकुछ’होऊन गेले
व्हिजन २४ तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
फिरोज तांबोळी
गोंदवले, : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून आले अन गावासाठी ‘सबकुछ’होऊन गेले.या दोन्हीही शिक्षकांची बदली झाल्याने अख्खी वाघमोडेवाडी हिरमुसुन गेली.प्रवीण जोशी व विनायक पानसांडे यांना निरोप देताना विद्यार्थ्यांसह गावकरी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
गोंदवले बुद्रुक जवळ बहुसंख्य धनगर समाज असलेले वाघमोडेवाडी हे छोटेसे गाव.गावात अधिकारी, शिक्षक,उद्योजक असणाऱ्यांची संख्याही मोठी.परंतु शिक्षणासाठी गावात जिल्हा परिषदेची एकमेव प्राथमिक शाळा.या शाळेत गेल्या चौदा वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील प्रवीण जोशी हे शिक्षक म्हणून दाखल झाले.शाळेची अवस्था बघून जिद्दीने कामाला सुरुवात केली.त्यानंतर आठ वर्षांनी विनायक पानसांडे सहशिक्षक म्हणून हजर झाले.या दोघांनी शाळेचे सर्वांगाने रुपडे पालटवण्यासाठीचा विडाच उचलला.ग्रामस्थांनच्या मदतीने यात त्यांना यशही आले. शैक्षणिक कामात ग्रामस्थांशी एकरूप झालेल्या गुरुजींना गावाचा लळा लागला.परंतु शैक्षणिक कामाबरोबरच गावातील सर्वच उपक्रमात सहभागी होत गावासाठी ‘मसिहा’ बनलेल्या या दोन्हीही शिक्षकांची यंदा बदली झाली.
ही बदली रद्द व्हावी म्हणून ग्रामस्थांनी केलेले प्रयत्न अपयशी ठरले अन या शिक्षकांना निरोप देण्याची वेळ आली.गुरुजींना निरोप देण्यासाठी अवघ्या काही मिनिटांतच सारे गावकरी जमले.गावाकडून दोघांचा सन्मानही करण्यात आला.यावेळी मोठा भावनिक सोहळा पाहायला मिळाला.निरोपाच्या कार्यक्रमात सर्वांचेच डोळे पाणावले होते.विद्यार्थी देखील गुरुजींना निरोप देताना भावनिक झाले होते.यावेळी भानुदास शिंगटे, राजू सुळे,वसंतराव मडके यांनी मनोगते व्यक्त केली.वाघमोडेवाडीची माणसं फणसारखी गोड असल्याचे विनायक पानसांडे यांनी सांगितले.तर बुद्धिमत्ते एवढेच नितीमत्तेने चांगले असे विद्यार्थी घडविण्याचे काम करता आल्याच्या भावना जोशी यांनी व्यक्त केल्या.
यावेळी सरपंच उमेश वाघमोडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर खताळ,आनंदराव वाघमोडे,दादासो पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————
श्री जोशी व श्री पानसांडे गुरुजींनी शिक्षणबरोबरच गावासाठी दिलेले योगदान आम्ही कधीच विसरणार नाही.——शेखर खताळ,अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती, वाघमोडेवाडी