व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश तळेकर
मुंबई, १८ ऑक्टोबर – बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे आयोजित आणि बृहन्मुंबई शाखेच्या नियोजनाखाली ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा विशेष कला महोत्सव १९ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा येथे पार पडणार आहे.
सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या महोत्सवात, १३ शाळांमधील २०० दिव्यांग बालकलावंत विविध कला सादर करतील. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून परिषदेच्या अध्यक्ष आणि सिने अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्रीही करण्यात येणार आहे. विक्रीतून आलेली रक्कम संबंधित शाळांना देण्यात येणार आहे. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून आयोजित हा महोत्सव महाराष्ट्रभर पसरविण्याचा मानस आहे, ज्यामध्ये दिव्यांग मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे उद्दिष्ट आहे.
महोत्सवाचे स्वरूप स्पर्धात्मक न ठेवता प्रोत्साहनात्मक असेल, आणि सहभागी प्रत्येक संघास पाच हजार रुपये मानदेय, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल. उपस्थित शिक्षकांचाही सन्मान केला जाईल.
सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तींनी या महोत्सवास भेट देऊन दिव्यांग मुलांच्या कलागुणांचे कौतुक करावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी राजीव तुलालवार, ज्योती निसळ आणि सुनील सागवेकर यांनी केले आहे.