सातारा-पंढरपूर मार्गावर म्हसवड-दिवड परिसरातील अपूर्ण पुलांचे काम सुरू; इंजि. सुनील पोरे यांच्या पाठपुराव्याला यश

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड –प्रतिनिधी
दीर्घकाळापासून सातत्याने लोकहितासाठी संघर्ष करणाऱ्या इंजिनिअर सुनील पोरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले असून, म्हसवड व दिवड परिसरातील अपूर्ण पुलांच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन, इंजि. पोरे यांनी सातारा-पंढरपूर महामार्ग तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करून जनतेच्या मागणीला दुजोरा दिला होता. त्यानंतर मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले, मात्र काही ठिकाणी पूल व मोऱ्यांची कामे रखडल्यामुळे अपघाताचे संकट निर्माण झाले होते.

या अपूर्ण कामांकडे एमएसआरडीसी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने, ३१ मे रोजी नागपूर येथे पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन, सुनील पोरे व त्यांच्या शिष्टमंडळाने या कामांसाठी तातडीने निर्देश देण्याची मागणी केली. या बैठकीत गडकरींनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना त्वरित काम सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

याच पार्श्वभूमीवर म्हसवड व दिवड येथील अपूर्ण पूल कामांची प्रत्यक्ष सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. या विकास कामामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्थानिक नागरिकांनी इंजि. सुनील पोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, “जनतेसाठी लढणारा खरा नेतृत्वकर्ता असा असावा,” अशा शब्दांत त्यांचा गौरव केला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *