उंब्रज – अंधारवाडी रस्त्यावर महिलांवर हल्ला; चाकूचा धाक दाखवत ३ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज /. कराड :प्रतिनिधी
गुरुवार, दि. 10 जुलै 2025 रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तीन महिलांवर तिघा अज्ञात चोरट्यांनी पल्सर मोटारसायकलवर येऊन चाकूचा धाक दाखवत हल्ला करून तब्बल ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या प्रकरणी मनिषा शहाजी कदम (वय ४५, व्यवसाय घरकाम, रा. उंब्रज) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनिषा कदम या रोज सकाळी उंब्रज ते अंधारवाडी रोडवर मॉर्निंग वॉकसाठी जातात. त्यांच्यासोबत त्यांच्या मैत्रिणी रोहिणी मारुती साळुंखेही होत्या. सकाळी सुमारे ६:५५ वाजता अंधारवाडी गावाच्या कमानीजवळ वळणावर असताना, तीन अनोळखी इसमांनी काळ्या रंगाच्या पल्सरवरून येत त्यांना रोखले.
तिघांपैकी एकाने मनिषा यांना खाली पाडून मारहाण केली व चाकू दाखवला. दुसऱ्या इसमाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे २ तोळ्यांचे मिनीगंठण (किंमत अंदाजे ₹८०,०००/-) जबरदस्तीने हिसकावले. या झटापटीत चाकूचा फटका मनिषा यांना अंगठ्यावर लागला असून त्यांना जखमी करण्यात आले आहे.
घटनेनंतर मनिषा यांच्या मैत्रिणीने आरडाओरडा करत पळ काढला. चोरटे लगेचच पल्सरवरून उंब्रजच्या दिशेने पळून गेले. यानंतर काही वेळातच अपुर्वा अर्जुगडे व त्यांची सासू सुनिता अर्जुगडे या उंब्रज ते शिवडे सर्व्हिस रोडने मॉर्निंग वॉक करत असताना सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास त्यांच्यावरही याच टोळीने हल्ला करून ५.५ तोळे वजनाचे, अंदाजे ₹२,२०,०००/- किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्ती हिसकावून नेले.
या साखळी जबरी चोरीच्या घटनेत एकूण ₹३,००,०००/- किमतीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. सर्व चोरटे तोंडाला मास्क लावलेले होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
उंब्रज परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे रात्र आणि पहाटे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
पोलिसांना आवाहन:
या घटनांमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पोलिसांनी त्वरीत आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी उंब्रज आणि परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

