उंब्रज अंधारवाडी रस्त्यावर मोकाट गाढवांचा हैदोस; शेतकरी, वाहनचालक हैराण
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
उंब्रज (प्रतिनिधी – कुलदीप मोहिते)
उंब्रज परिसरातील अंधारवाडी रस्त्यावर मोकाट गाढवांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे शेतकरी, विद्यार्थी व वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्या आता जोरात सुरू असताना, या गाढवांचा उपद्रव शेतकऱ्यांच्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे.
शेतात उगवलेले गवत व तण खाण्यासाठी मोकाट सोडलेली ही गाढवं पेरणी झालेल्या शेतांमध्ये धुडगूस घालत आहेत. शेती मशागतीच्या कामात व्यग्र असलेल्या शेतकऱ्यांना आता गाढव हाकण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी शिवारातील नुकसानीमुळे संतप्त असून, यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे.
गाढवांचा त्रास रस्त्यापुरताच मर्यादित नसून, रहदारीलाही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अंधारवाडी, साबळवाडी आणि कोरीवळे या तीन गावांच्या मुख्य रस्त्यावर ही गाढवं बिनधास्तपणे उभी राहत असून, शाळेत जाणारे विद्यार्थी, कार्यालयात निघालेले कर्मचारी आणि सर्वसामान्य प्रवासी यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे.
दुचाकीस्वार अपघातग्रस्त होण्याचे प्रकारही समोर आले आहेत. यापूर्वी काही नागरिक गाढवांना धडक दिल्याने किरकोळ जखमी झाले असून, यामुळे संभाव्य मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व प्रकारांमुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, “पेरलेल्या रानात तुडवा केल्यावर गाढव मालकांना जाग येणार का?” असा सवाल शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत संबंधित गाढव मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकऱ्यांचे श्रम व पेरणीचे नियोजन वाया जाण्याऐवजी, स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस प्रशासनाने पुढाकार घेऊन या गाढव मालकांना खबरदार करणे आणि अशा प्रकारास आळा घालणे अत्यावश्यक झाले आहे.