निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यातील आठवडे बाजार दोन दिवस बंद
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड | प्रतिनिधी
माण तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 शांततेत, निर्भय व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून तालुक्यातील सर्व संबंधित आठवडे बाजार दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान प्रक्रिया शनिवार दि. 07 फेब्रुवारी 2026 रोजी तर मतमोजणी सोमवार दि. 09 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. तालुक्यातील 05 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गणांतील एकूण 217 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गर्दी टाळावी आणि प्रशासनाला सुरळीत कामकाज करता यावे यासाठी आठवडे बाजार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मा. जिल्हादंडाधिकारी सातारा यांच्या सूचनेनुसार व मार्केट अॅन्ड फेअर अॅक्ट 1862 च्या कलम 7 (अ) अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विकास अहिर यांनी हा आदेश जारी केला आहे.
यानुसार दि. 07 फेब्रुवारी रोजी विरळी, वावरहिरे व पळशी येथील आठवडे बाजार, तर दि. 09 फेब्रुवारी रोजी दहिवडी येथील आठवडे बाजार बंद राहणार आहेत.
सदर आदेशाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून व्यापारी व नागरिकांना करण्यात आले असून पोलीस व महसूल यंत्रणेला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार विकास अहिर यांनी केले आहे.

