वारी पंढरीची… म्हसवड मेडिकल असोसिएशनकडून मोफत आरोग्य सेवा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड, : प्रतिनिधी
पंढरपूरकडे पायी दिंडीने विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या हजारो वारकऱ्यांना म्हसवड मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आली. सिदनाथच्या पावन नगरीतून मार्गस्थ होणाऱ्या पालखीतील शेकडो वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले.

या उपक्रमासाठी म्हसवड मेडिकल असोसिएशन, परिसरातील डॉक्टर्स, लॅब टेक्निशियन (माणगंगा पॅरामेडिकल कॉलेज, मासाळवाडी), तसेच नर्सिंग स्टाफ यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला. 1 जुलै रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाललेल्या या आरोग्य सेवा शिबिरात शेकडो वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना वाटणाऱ्या त्रासांमध्ये हात-पाय दुखणे, पायाला फोड येणे, सर्दी-ताप, पोटाचे विकार, रक्तदाब व साखरेची तपासणी यांचा समावेश होता. सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आणि गरजूंना औषधेही मोफत देण्यात आली.

या सेवा शिबिरात सहभागी झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिवसभर मोलाचे योगदान दिले. “25-30 किलोमीटर पायी चालूनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा भक्तिभाव आणि समाधान आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले,” असे प्रतिपादन काही डॉक्टरांनी केले.
वारी दरम्यान अशा वैद्यकीय सेवेमुळे अनेक वारकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली असून, यासाठी म्हसवड मेडिकल असोसिएशनचे समाजातून विशेष कौतुक होत आहे.

