वीरचक्र विजेते कै. लक्ष्मण साळुंखे यांच्या शौर्याचा गौरव – मौजे वराडेत ‘वीरता दिवस’
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते, कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील मौजे वराडे गावात वीरचक्र विजेते ऑ.कॅप्टन (नि.) कै. लक्ष्मण साळुंखे यांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी वीरता दिवस आणि कोनशिला लोकार्पण व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक सोहळा गुरुवार, दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता पार पडणार असून गावात तसेच तालुक्यात उत्सुकता पसरली आहे.
सुभेदार लक्ष्मण साळुंखे हे भारतीय सैन्यात १९ मराठा लाईफ इन्फंट्री मध्ये कार्यरत होते. १९६५ च्या युद्धात पश्चिम विभागात त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते वीरचक्र बहाल केले. त्यांच्या या शौर्यामुळे कराड तालुका, सातारा जिल्हा आणि वराडे गावाचे नाव संपूर्ण देशभर अभिमानाने उज्ज्वल झाले.
युवक व पुढील पिढ्यांना शौर्याची प्रेरणा मिळावी या हेतूने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय सैनिक फेडरेशन, आजी-माजी सैनिक संघटना व सैनिक कक्ष कराड तालुका यांनी घेतला आहे. या संदर्भात तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, डी.वाय.एस.पी. यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

या सोहळ्यासाठी सर्व आजी-माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या प्रसंगी सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा संरक्षण समिती सदस्य श्री. प्रशांत कदम, कराड तालुका अध्यक्ष श्री. सदाशिव नागणे, वराडे सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र घाडगे, उपाध्यक्ष श्री. गोरखनाथ साळुंखे तसेच वीरचक्र विजेते कै. साळुंखे यांचे सुपुत्र श्री. हणमंत साळुंखे उपस्थित होते.

