उंब्रज पोलीस ठाण्याला ‘बेस्ट पोलीस स्टेशन’चा सन्मान: कायदा-सुव्यवस्थेत ठरले अग्रेसर

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
श्रीकांत जाधव
उब्रज , प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलात उंब्रज पोलीस ठाण्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने बाजी मारत ‘बेस्ट पोलीस स्टेशन इन कनव्हिक्शन रेट’चा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत या ठाण्याच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला.

उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस हवालदार संजय धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल टी. एच. कार्वेकर, पी. आर. पाटील आणि राजू कोळी यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे.

कायदा-सुव्यवस्थेचे उत्कृष्ट व्यवस्थापन

रविंद्र भोरे यांनी उंब्रज पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणासाठी एक चोख कार्यपद्धती अवलंबली. गुन्ह्यांच्या फाईलींचे बारकाईने परीक्षण करून गुन्हेगारांना न्यायालयात शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न केले. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तडीपारी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम प्रभावीपणे केले.

पोलीस ठाण्यातील प्रत्येक बीट अंमलदारांसोबत समन्वय साधत अवैध व्यवसाय, गुन्हेगारी कृत्ये यांना उंब्रजच्या हद्दीत रोखण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला. नागरिकांशी संवाद साधून गोपनीय माहितीच्या आधारे छापे, कोम्बिंग ऑपरेशन आणि वॉरंट बजावण्याची कामगिरी ठाण्याने सातत्याने केली.

सामाजिक सुरक्षेला प्राधान्य

रविंद्र भोरे यांनी कायदा व सुव्यवस्था राखताना सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला केंद्रस्थानी ठेवले. महिलांवर होणारे अत्याचार, मुलांवर होणारे अन्याय यांसारख्या गुन्ह्यांवर कडक उपाययोजना केल्या. अवैध व्यावसायिक व गुन्हेगारांवर कारवाई करताना सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतली.

पुरस्काराचा सन्मान आणि प्रेरणा

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी उंब्रज पोलीस ठाण्याच्या या कामगिरीची विशेष दखल घेतली आणि ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सन्मानित केले. या सन्मानाबाबत प्रतिक्रिया देताना रविंद्र भोरे म्हणाले, “सामान्य नागरिकांचे सहकार्य आणि पोलीस दलाच्या समन्वयातूनच ही कामगिरी शक्य झाली. हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी असून पुढील काळात अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.”

उंब्रज पोलीस ठाण्याची ही कामगिरी जिल्हा पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची ठाम भूमिका सर्वांसाठी आदर्श ठरत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!