युवतींच्या सुरक्षेसाठी उंब्रज पोलीस दलाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सागर खबाले, महिला पोलिस अंमलदार मुळीक, आणि पोलीस अमलदार कूंदे व मासाळ यांनी महात्मा गांधी विद्यालय, उंब्रज येथे विद्यार्थ्यांना भेट दिली. या भेटीदरम्यान, विद्यार्थिनींना सुरक्षितता आणि स्वसंरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात सातारा पोलीस दलामार्फत राबवण्यात येणारे ‘निर्भया पथक’, ‘भरोसा सेल’, आणि ‘अभया’ या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यामध्ये “गुड टच” आणि “बॅड टच” ओळखणे, त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, स्वसंरक्षणाचे महत्त्व, आणि मोबाईलपासून संरक्षणाच्या उपाययोजना या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक हेल्पलाइन क्रमांक तसेच पोलीस ठाण्याचे संपर्क क्रमांक देखील यावेळी विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले.
याव्यतिरिक्त, उंब्रज गावातील महाविद्यालय रोड आणि ST स्टँड परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीची शिस्त पाळण्यासाठी आणि परिसरातील शांतता राखण्यासाठी पोलीस दल सातत्याने कार्यरत आहे.
या उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये सुरक्षा आणि स्वसंरक्षणाबाबत जागरूकता वाढली असून, उंब्रज पोलीस दलाचे हे पाऊल प्रशंसनीय ठरत आहे.