अवघ्या आठ मिनिटांत चार जुगार अड्डे उद्ध्वस्त डिव्हायएसपींच्या पथकासह उंब्रज पोलिसांची धडक कारवाई; अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 

कुलदीप मोहिते | उंब्रज प्रतिनिधी

:
शहरातील बाजारतळ परिसरात सुरू असलेल्या बेकायदा ‘कल्याण’ मटका जुगारावर शनिवारी (दि. २८) सायंकाळी उंब्रज पोलिसांनी एकाच वेळी सलग छापे टाकत मोठी कारवाई केली. सायंकाळी पाचच्या सुमारास सापळा रचून अवघ्या आठ मिनिटांत पिंपळाच्या झाडाजवळ, पाण्याच्या टाकीजवळ, मच्छी मार्केट परिसरात तसेच राज पानशॉपच्या आडोशाला असे चार जुगार अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

   या कारवाईत जुगारासाठी वापरण्यात येणारी स्लिपबुक, निळ्या शाईचे बॉलपेन तसेच एकूण सुमारे ८ हजार ४५० रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली.
दरम्यान सर्व संशयितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
        पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उंब्रज परिसरात अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस उपअधिक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उपविभागीय कार्यालय व उंब्रज पोलिसांनी संयुक्त कारवाई केली . सहाय्यक पोलीस निरिक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज पवार यांनी छापासत्र सुरू केले आहे.                 शनिवारी सायंकाळी बाजारतळावरील पिंपळाच्या झाडाच्या आडोशाला अस्लम सतार मुल्ला (रा. उंब्रज) आणि त्याचा साथीदार संभाजी दाजीराम जाधव (रा. चरेगाव) हे लोकांकडून मटका जुगारासाठी पैसे स्वीकारताना आढळले. त्यांच्याकडून रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले.
       यानंतर पाण्याच्या टाकीजवळ अस्लम मुल्ला याच्यासोबत सुरेश शंकर कांबळे (रा. संत रोहीदासनगर, उंब्रज) हा जुगार चालविताना पकडला गेला. त्यांच्याकडूनही मोठी रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
         मच्छी मार्केट परिसरात राजू ऊर्फ राजेंद्र धोंडीराम जाधव (रा. उंब्रज) व महेश गुलचंद पवार (रा. शिवाजीनगर, उंब्रज) हे मटका स्वीकारताना रंगेहात सापडले; तर राज पानशॉपच्या आडोशाला राजेंद्र जाधव याच्यासोबत संजय लक्ष्मण चव्हाण (रा. उंब्रज) याच्यावरही कारवाई करण्यात आली.
         एकाच सायंकाळी, एकाच परिसरात सलग छापे टाकून पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर मोठा धाक निर्माण केला आहे.पोलीस उपअधिक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरिक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज पवार, उपविभागीय कार्यालयातील प्रविण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी यांच्यासह पोलीस सहभागी होते.
अंमलदार म्हणून पोलीस हवालदार मुळे यांनी काम पाहिले असून, पुढील तपास फडतरे व पवार करीत आहेत.
उंब्रज परिसरात बेकायदा जुगाराविरुद्ध कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *