शेकडो वर्षांची परंपरा जपणारा उंब्रजचा सुप्रसिद्ध भीम–कुंती उत्सव

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

कुलदीप मोहिते
उंब्रज (ता. कराड, जि. सातारा)
श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी उंब्रज नगरीत साजरा होणारा भीम–कुंती पंचक्रोशी उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, श्रद्धा, भक्ती, सर्वधर्मसमभाव व ऐक्याचा जिवंत दुवा ठरला आहे. जवळपास चारशे वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या या उत्सवाला हजारो भाविकांची गर्दी होते.

तारळी, उत्तरमांड व कृष्णा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या उंब्रज गावाला ऐतिहासिक आणि धार्मिक असा वैभवशाली वारसा लाभला आहे. श्री उमेश्वर महादेव, श्री कोटेश्वर आणि श्री भिकेश्वर या तीन प्रमुख दैवतांच्या सान्निध्यात हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो.

लोकश्रुतीनुसार, सुमारे 400 वर्षांपूर्वी गावातील कासार पाटील यांचा मुलगा आजारी पडला होता. भीमसेन महाराजांची मातीची मूर्ती घडवण्याची मनोकामना केल्यानंतर त्यांचा मुलगा बरा झाला. त्यानंतर कृतज्ञतेपोटी भीम–कुंती उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर या उत्सवाने विराट रूप धारण केले आणि आजही ती परंपरा अखंड सुरू आहे.

या उत्सवाचा मुख्य आकर्षण म्हणजे कुंतीमातेची पुत्र भीमाशी होणारी पारंपरिक भेट.
पूर्वी कुंतीमातेची मूर्ती गजराजावरील अंबारीतून नेली जात असे; आता रथातून मिरवणूक काढली जाते. ढोल–ताशांच्या गजरात गावाची प्रदक्षिणा पूर्ण करून भीम चौकात हा भावपूर्ण क्षण साकारतो. भाविकांसाठी हा क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा ठरतो.

भीमसेन महाराजांची मातीची महाकाय प्रतिमा घडवण्यासाठी गावकरी एक महिना आधीपासून तयारी करतात. सुमारे १६ बैलगाड्यांतून माती आणली जाते. आनंदपूर येथील श्री. आदिक कुंभार व सहकारी गेली अनेक वर्षे या मूर्ती घडवतात.

उत्सव काळात भाविक नवस बोलतात. नवस फेडताना भीमासाठी धोनचा आणि कुंतीमातेसाठी चोळी, खण व नारळाचे तोरण अर्पण केले जाते.
उत्सवाचा समारोप भाद्रपद पौर्णिमेला होणाऱ्या भव्य भंडाऱ्याने होतो. २१ पायली धान्यातून बनवलेला हा भंडारा हजारो भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.

भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भीम–कुंती प्रतिमा कृष्णा नदीकाठी नेल्या जातात. तरुणांच्या हुल्लडबाजीत ‘भीम गाडा’ ओढत विसर्जन मिरवणूक निघते. पूर्वी कोळी बांधव होड्यांमधून प्रतिमांना प्रदक्षिणा घालून विसर्जित करत असत; आता विधी साध्या पद्धतीने होतो.

संपूर्ण उत्सवाचे नियोजन भीमसेन उत्सव मंडळ, ग्रामपंचायत व उंब्रज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून केले जाते. यंदा सपोनि रविंद्र भोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

आजच्या बदलत्या काळात उत्सवाचे स्वरूप जरी बदलले असले तरी भाविकांच्या मनातील श्रद्धा, उत्साह आणि आनंद मात्र कायम आहे. आई–लेकाच्या भेटीचा हा सोहळा दरवर्षी उंब्रज नगरीला आध्यात्मिक उर्जा देऊन जातो.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *