राधानगरी अभयारण्यात दोन नर वाघांची नोंद; सह्याद्रीत वाघसंख्या वाढीचे संकेत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते
कराड : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य येथे दोन नर वाघांच्या अस्तित्वाची अधिकृत नोंद वन विभागाकडून करण्यात आली आहे. नियमित गस्तीदरम्यान तसेच कॅमेरा ट्रॅपमधून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे STR-07 आणि STR-08 असे नामांकन असलेले हे दोन्ही वाघ प्रौढ नर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वाघांच्या हालचालींवर सतत निरीक्षण ठेवण्यात येत असून त्यांच्या स्वतंत्र क्षेत्रांचा (टेरिटरी) अभ्यास सुरू आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार दोन्ही वाघ वेगवेगळ्या क्षेत्रात भ्रमण करत असल्याचे दिसून येत आहे.

गस्ती पथकांना मिळालेले पगमार्क्स, कॅमेरा ट्रॅप छायाचित्रे तसेच इतर वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे या वाघांची ओळख निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या हालचालींचे मार्ग, पाणवठ्यांचा वापर आणि निवासक्षेत्र यांचे सखोल विश्लेषण सुरू असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

दरम्यान, सावंतवाडी-दोडामार्ग ते राधानगरी हा परिसर वाघांच्या नैसर्गिक भ्रमण मार्गाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. हा मार्ग पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यंत जोडला जात असल्याने वाघांच्या स्थलांतराला चालना मिळत आहे.

मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले की, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वाघांची वाढती संख्या ही व्याघ्र संवर्धनाच्या यशाचे द्योतक आहे. तसेच ‘रायबा’ (T7) आणि ‘सरदार’ (T8) हे वाघ सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाचा दुवा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनीही या घडामोडीला दुजोरा देत, “सध्या T1 ते T9 या नऊ वाघांचे अस्तित्व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्याला जोडणाऱ्या राधानगरी परिसरात असल्याचे नोंदवण्यात आले आहे,” अशी माहिती दिली.

नोंद असलेले वाघ (T1 ते T9) :

सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, सरदार, शिलेदार

(वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब मानली जात असून सह्याद्रीतील जैवविविधतेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.)


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *