कुलदीप मोहिते कराड : (प्रतिनिधी ) सातारा जिल्ह्याने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इतिहास घडवत महायुतीला संपूर्ण जिल्ह्याचा किल्ला जिंकून दिला आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात कमळ फुलताच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यामुळे साताऱ्याचे महत्त्व राज्याच्या राजकारणात वाढले असून, जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार, याची चर्चा सातारकरांमध्ये जोर धरत आहे.
शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्यात चुरस
जिल्ह्यात शिवेंद्रराजे भोसले यांनी एक लाख 42 हजारांच्या विक्रमी मताधिक्यासह विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली आहे. स्वच्छ प्रतिमा, अनुभव आणि बेरजेचे राजकारण यामुळे त्यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी अग्रक्रमावर आहे. दुसरीकडे, जयकुमार गोरे यांचीही जोरदार दावेदारी आहे. त्यांनी साताऱ्यात महायुतीचा दबदबा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शंभूराजे देसाई आणि इतर नावांचीही चर्चा
शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय शंभूराजे देसाई यांचेही नाव चर्चेत आहे. मागील मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाल्यामुळे, या वेळी महेश शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय अजित पवार गटाकडून मकरंद पाटील यांचे नावही समोर येत आहे. जिल्ह्यातील राजकीय समतोल साधण्यासाठी दोन मंत्रिपदे साताऱ्याला मिळण्याची शक्यता असल्याने सातारकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
साताऱ्यात भाजपचा उदय; नवे चेहरे विधानसभेत
या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात कमालीची कामगिरी करत कराड उत्तरमधून मनोज घोरपडे, दक्षिणमधून अतुल भोसले यांना निवडून आणले. फलटणमधून राष्ट्रवादीचे सचिन पाटील आणि इतर आमदारांनी आपली कामगिरी बजावली.
जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे?
शिवेंद्रराजे भोसले यांचा सीनियर नेता म्हणून अनुभव, तर जयकुमार गोरे यांची मैदानातील ऊर्जा यामुळे दोघेही प्रबळ दावेदार आहेत. मात्र, शंभूराजे देसाई आणि मकरंद पाटील यांसारखे नावही चर्चेत असल्याने जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार, याची प्रतीक्षा संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे.
आता मुंबईत सुरु असलेल्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष असून, साताऱ्याच्या नेतृत्वाचा झेंडा कोणाच्या हाती जातो, याचा फैसला लवकरच होईल.