तयार तुती रोपांची लागवड केल्यास तुती बाग लवकर हाताशी येणार: पी. एस. पाडवी* शेतकऱ्याना तुती लागवडीचे प्रशिक्षण शेतात, शेतकऱ्यानी स्वतः रोपे तयार करण्यास प्रोत्साहन
प्रतिनिधी ;दौलत नाईक
दहिवडी :
तुती लागवड करतांना काड्याचे रोपण करण्या ऐवजी स्वतःची रोपवाटिकेत रोपे तयार करावीत व या तयार रोपांची लागवड केल्यास बागेत रोपांची मर होऊन संख्या घटणार नाही. परिणामी बागेतील रोपे एकसारखी येतील , पुन्हा पुन्हा दुरुस्ती करून रोपांची लागवड करण्याची गरज भासणार नाही. त्यातून शेतकऱ्याचे श्रम, वेळ व अनाठायी खर्च वाचण्यास मदत होईल असे प्रतिपादन वाईचे रेशीम विकास अधिकारी श्री. पी. एस. पाडवी यांनी केले.
पळशी ता. माण येथे जिल्हा रेशिम कार्यालय वाई (सातारा ) व ग्रामपंचायत पळशी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्या साठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पी.जी. निकम, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक सी.डी. दानवे, क्षेत्र सहाय्यक आर.डी. पाटील सरपंच शांताबाई खाडे, उपसरपंच केशव खाडे-मुगदे, सदस्य मानसिंग खाडे, संजय गंबरे, पोलीस पाटील यशवंत गंबरे, ज्ञानेश्वर नवाळे, शहाजी माळवे व् परिसरातील प्रशिक्षणार्थी रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
पाडवी म्हणाले, नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यानी योग्य प्रकारे विकसित झालेल्या रोपांची लागवड करावी, जेणेकरून लागन झाल्यानंतर जमिनीशी एकरूप होऊन वाढ चांगली होईल, तसेच थंडीच्या दिवसात लागवड करण्याचे टाळून शक्यतो फेब्रुवारीत लागवड करावी लागवडी साठी या दिवसातील वातावरण पोषक असते. रोप लागवडीसाठी दर्जेदार काडीचा वापर करावा तसेच तीन डोळ्यावर काडीची छाटणी करून बुरशीनाशक व मूळ वाढीच्या द्रावणात पंधरा मिनिटे भिजत ठेऊन नंतर गादी वाफ्यावर लागवड करावी म्हणजे चांगल्या प्रतीची रोपे तयार होतील. स्वतः शेतकऱ्यानी रोपे तयार केल्यास आर्थिक व वेळेची बचत होईल असे मत पाडवी यांनी व्यक्त केले.
दरम्यान, प्रशिक्षक अधिकाऱ्यांचा सरपंच शांताबाई खाडे, उपसरपंच केशव खाडे,सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रोप लागवडीसाठीच्या काडीची छाटणी, औषधांचा वापर, गादी वाफ्यावर काडी लागवडीचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्याना थेट तुती बागेत दाखवण्यात आले.