खाजगी सावकारकी करून त्रास – शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
म्हसवड प्रतिनिधी – अहमद मुल्ला, व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड (ता. माण) –
जांभुळणी (वीरकरवस्ती) येथील शेतकरी बाळकृष्ण ज्ञानदेव जानकर (वय ५५) यांनी मानसिक त्रासातून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात म्हसवड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केली.
मयत बाळकृष्ण जानकर यांनी तीन वर्षांपूर्वी आरोपी अशोक बाबा कोकरे, प्रवीण अशोक कोकरे आणि दीपक अशोक कोकरे (सर्व रा. जांभुळणी, ता. माण, जि. सातारा) यांच्याकडून ₹१०,०००/- इतकी रक्कम घेतली होती. ती रक्कम दहा टक्के व्याजासह परत केल्यानंतरही आरोपींनी चक्रीवाढ व्याजाचा तगादा लावून त्यांना आर्थिक व मानसिक छळ दिला.
याच दरम्यान आरोपींनी व्याजाच्या मोबदल्यात जानकर यांच्या नावावर असलेली २४ गुंठे शेतीजमीन दस्तऐवज करून घेतली आणि उर्वरित रक्कम न देता शेतकऱ्याला त्रास देत राहिले. या त्रासामुळे बाळकृष्ण जानकर यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्महत्या केली.
या घटनेचा अकस्मात मृत्यू क्रमांक ३५/२०२५ म्हणून नोंद करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे तपास करत होते. चौकशीत वरील तिघा आरोपींचा त्रास आणि सावकारी व्यवहार स्पष्ट झाल्याने म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३३/२०२५ भा.दं.वि. (BNS) कलम १०८ तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

