काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सन्मानाने बरोबर घ्या,. अन्यता … प्रा. विश्वंभर बाबर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड…. प्रतिनिधी
   आगामी माण विधानसभा मतदार संघ निवडणुकी बाबत महाविकास आघाडी अंतर्गत महत्त्वपूर्ण चर्चा करताना माण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सन्मानाने बरोबर घ्या अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी दिला आहे.
      याबाबत बोलताना प्रा. विश्वंभर बाबर म्हणाले महाविकास आघाडी अंतर्गत माण विधानसभा मतदारसंघात भाजपा विरोधात एकास एक लढत होण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी सोमवारी सातारा येथे एक बैठक झाली. ही बैठक ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्याचे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. या बैठकीसाठी माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे, अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख, अभयसिंह जगताप, मनोज पोळ इत्यादी नेते उपस्थित असल्याचे प्रसिद्ध झालेल्या बातमीत दिसून येत आहे.

       या बैठकीत केवळ राष्ट्रवादीच्या अ आणि ब गटातील पदाधिकाऱ्याचा भरणा दिसत आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी माण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील एकाही वरिष्ठ पदाधिकाऱ्याला बोलवले नसल्याबद्दल प्राध्यापक बाबर व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महा विकास आघाडी अंतर्गत माण विधानसभा मतदार संघावर राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला हक्क आहे. हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजीत सिंह देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातारा येथील जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत तर आपण स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची मुंबई येथे शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन माण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याबाबत ची मागणी केलेली आहे. प्रदेश काँग्रेस कार्यालयाने केलेल्या आवाहनानुसार आपण स्वतः माण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक म्हणून काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाद्वारे रीतसर अर्ज प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे दाखल केलेला आहे.

       यावेळी म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी, माजी सभापती विजय बनसोडे, बाळासाहेब आटपाडकर, विष्णुपंत अवघडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याचे बाबर यांनी सांगितले.
सध्याच्या अत्यंत संवेदनशील राजकीय परिस्थितीत माण मतदार संघात भाजपचा पराभव करण्यासाठी, व एकास एक लढत होणे कामी महाविकास आघाडी अंतर्गत इच्छुक उमेदवारासह, माण तालुक्यातील आम्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सन्मानाने बरोबर घेणे गरजेचे असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी सांगितले.

     माण विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधात एकास एक लढत व्हावी यासाठी आमचीही सहमती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व आमचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आदेश आम्हाला अंतिम असल्याचेही प्राध्यापक बाबर यांनी स्पष्ट केले . सातारा येथे संपन्न झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत माण तालुका राष्ट्रीय काँग्रेस मधील एकाही वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा समावेश नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून यापुढे आम्हाला केवळ गृहीत धरू नका असा इशारा विश्वंभर बाबर, विकास गोंजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!