बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान; नागरिक त्रस्त, उपोषणाचा इशारा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी या महत्त्वाच्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) सुरु असून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने व्यापारी आणि नागरिक दोघांचेही हाल होत आहेत. दोन ते तीन महिने खणून ठेवलेल्या या रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, रहिवासी आणि दुकानदारांना अक्षरशः घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

कामाच्या धीम्या गतीमुळे व्यापाऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा झाला आहे. विशेषत: भुसार आणि जनावरांच्या पेंडीचे होलसेल व्यापारी महेंद्रकुमार मोडासे यांचे दुकान रस्त्यालगत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा व्यापार पूर्णतः ठप्प झाला आहे. त्यांच्या दुकानासमोर खणलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने ग्राहक दुकानात फिरकत नाहीत. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान त्यांना सहन करावे लागत आहे.

त्याशिवाय, PWD कडून या रस्त्याच्या केवळ 200 मीटर भागावरच सिमेंट रस्ता करण्याचे नियोजन असल्याचे समजते. उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण नंतर केले जाणार असल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणींना तोडगा निघालेला नाही. मोडासे यांनी वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले.

या प्रकरणी दोशी यांनी तात्काळ नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांची भेट घेतली. मोडासे यांच्या दुकानासमोर मुरूम टाकून तातडीने रस्ता तयार करावा, अन्यथा व्यापारी आणि नागरिकांसमवेत तेथील खड्ड्यातच उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *