व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले – सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील पिंपरी केंद्राची तंबाखू मुक्त प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.सलाम मुंबई फौंडेशन व जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आपली शाळा आणि परिसर तंबाखू मुक्त राहण्यासाठी घ्यावयाची दक्षता ,काळजी आणि त्यासाठीचे महत्त्वपूर्ण नियम याबद्दल या प्रशिक्षण कार्यशाळेत पिंपरी केंद्रातील शिक्षकांना सविस्तरपणे सांगितले गेले.शाळा बालपरिषदेतून विद्यार्थ्यांनासाठी योग्य प्रकारे करावयाचे मार्गदर्शन आणि अंमलबजावणी यावरही संपूर्ण माहितीही या कार्यशाळेतून देण्यात आली. त्यासाठी पिंपरी केंद्रातील प्रशिक्षणाचे मास्टर ट्रेनर वक्तृत्वाची जबर छाप असणारे लोधवडे शाळेचे होतकरू, उपक्रमशील, प्रतिभा संपन्न असे पट्टीचे वक्ते व तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक मा.सतेशकुमार मारुती माळवे यांनी यावेळी आपल्या बोधपर तेजस्वी वाणीतून आणि प्रत्यक्ष आधुनिक तंत्रज्ञानाच्या चलत रूपातील एल डी टी व्ही. पी.पी.टी. च्या माध्यमातून उपस्थित शिक्षकांना तंबाखू मुक्त व व्यसनमुक्तीवर सुंदर असे मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून बलशाही,समृद्ध आणि निरोगी असा आरोग्य संपन्न भारत देश घडविण्यासाठी शिक्षक,शाळा आणि समाजाची असणारी योग्य प्रकारची नेमकी भूमिका कोणती आणि कशी असावी.याबद्दलचे सविस्तर असे मार्गदर्शन केले. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आणि व्यसनाचे भविष्यात मानवी शरीरावर होणारे दूरगामी विपरीत दुष्परिणामांची जाणीव उपस्थितांना करून दिली.कॅन्सर सारखे महाभयंकर आजार आपणास जडू नयेत.त्यासाठी योग्य प्रकाराने घ्यावयाची काळजी आणि दक्षता यावरही त्यांनी व्याख्यानातून मोलाचा सल्ला आणि संदेश दिला आहे.आपल्या भारत देशाची भावी पिढी व्यसनमुक्त आणि निरोगी राहण्यासाठी सध्य स्थितीला विद्यार्थी आणि समाज मनावर बिंबवायचे दीर्घकालीन सुसंस्कारमय, परिवर्तनशील व कृतीयुक्त असे अनमोल विचार त्यांनी उपस्थित शिक्षकांच्या पुढे आपल्या व्याख्यानातून मांडले. आपल्या बोधपर वाणीतून विविध दाखले आणि उदाहरणे देऊन त्यांनी तंबाखूमुक्त व व्यसनमुक्तीचा एक प्रकारे नाराच दिला आहे.तंबाखूमुक्त आणि व्यसनमुक्तीकरिता शिक्षकांची शाळा व समाजात असलेली महत्त्वपूर्ण भूमिका यावरही त्यांनी भाष्य केले.त्यासाठी त्यांनी आपल्या व्याख्यानातून शाळा,गाव व विद्यार्थी पातळीवर करावयाच्या विविध उपाययोजनांची माहिती या तंबाखूमुक्त प्रशिक्षणातून दिली आहे.