कराडमध्ये वाघाच्या अफवांमुळे खळबळ; AI-निर्मित बनावट व्हिडीओचा पर्दाफाश

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

कुलदीप मोहिते

कराड | प्रतिनिधी

कराड शहरातील मुजावर कॉलनी परिसरात वाघ असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, वनविभागाच्या तपासणीत हा व्हिडीओ बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून ओमकार खंडु बोबाटे (रा. मुजावर कॉलनी, कराड) याने दि. 29 जानेवारी 2026 रोजी विविध सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅपद्वारे वाघाच्या अस्तित्वाचा व्हिडीओ प्रसारित केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सदर प्रकरणाची माहिती मिळताच वनविभाग कराडच्या पथकाने तात्काळ संबंधित परिसरात जाऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासणीत कुठेही वाघाचा वावर आढळून आला नाही. तसेच परिसरातील कोणत्याही नागरिकाने वाघ प्रत्यक्ष पाहिल्याची खात्री झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व सोशल मीडियावर येणारे संशयास्पद संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, सदर व्हिडीओ पुढील तांत्रिक तपासणीसाठी कराड येथील सायबर क्राईम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणातील कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते (सातारा) व सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव (वनी व कॅम्पा, सातारा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत वनक्षेत्रपाल ललिता पाटील (कराड), वनपाल आनंद जगताप (मलकापूर), वनरक्षक अक्षय पाटील (शेणोली), अभिजीत शेळके (नांदगाव) तसेच RRT पथकातील अजय महाडीक व रोहित कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *