राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना दिलेल्या धमकीचा दहिवडीमध्ये निषेध* दहिवडीच्या फलटण चौकात केला रास्ता रोको
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (अहमद मुल्ला)
दहिवडी, प्रतिनिधी
महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार यांना ‘तुमचा दाभोळकर करु’ या समाजमाध्यमातून दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिवडीत निषेध मोर्चा काढून दहिवडी येथील फलटण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘साहेबांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे’ असा इशारा देण्यात आला.
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आपल्या नेत्याला देण्यात आलेल्या धमकीमुळे राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते संतापले असून राजकारण तापले आहे. या धमकीचा सर्वत्र विविध प्रकारे निषेध करण्यात येत आहे.
आज माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहापासून फलटण चौकापर्यंत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
श्रीराम पाटील म्हणाले, हे एवढं सोप्पं आहे का? पुरोगामी महाराष्ट्रात असले प्रकार सहन केले जाणार नाहीत. प्रा. कविता म्हेत्रे म्हणाल्या, साहेबांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्हाला जिवंत ठेवलं जाणार नाही. प्रशांत विरकर म्हणाले, या सरकारने जातीयवादी कुत्र्यांना आवर घातला नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल. आमच्या नेत्यांना दिलेल्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा महेश जाधव व विजय जगताप यांनी दिला. किशोर सोनवणे व दिलीप तुपे म्हणाले, अशा धमक्यांनी राष्ट्रवादी गर्भगळित होईल असं कुणाला वाटत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं, आम्ही अशा धमक्यांना भिक घालत नाही. विक्रम शिंगाडे यांनी साहेबांसाठी आम्ही यापुढे रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज आहोत असा इशारा दिला. धर्मांध विचाराच्या सरकारमुळेच माथेफिरू अशी हिंमत करु लागल्याचा आरोप सतीश मडके यांनी केला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना धमकीच्या निषेधाचे निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेत मनोज पोळ, सुभाष नरळे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, तानाजी कट्टे, खटाव तालुका महिलाध्यक्षा डाॅ. प्रियांका माने, विष्णुपंत अवघडे, बाळासाहेब काळे, बाबुराव काटकर, तानाजी मगर, सुरेंद्र मोरे, विशाल पोळ, ऋषिकेश जगताप, वैशाली कांबळे, विजय भोसले, दादासाहेब चोपडे, अमोल पोळ, चेतन मुळीक, अजित चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.